भाऊसाहेब लोंढे समाजकारणातील सर्वसामान्यांचा आधारवड - सरपंच हारदे

राहुरी / बाळकृष्ण भोसले - सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती जेव्हा समाजकारणात पडतो, तेव्हा त्याला अनेकविध समस्यांचा सामना करावा लागतो आणि या समस्यांचा सामना करता करता यदाकदाचित त्यात तो त्यात यशस्वी झालाच तर जनतेच्या गळ्यातील ताईत बनतो. त्याचेच प्रतीक म्हणजे भाऊसाहेब लोंढे यांचा कोल्हारकरांनी आयोजिलेला अभिष्टचिंतन सोहळा असल्याचे प्रतिपादन चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे यांनी केले.

कोल्हार खुर्द येथे पदमभूषण खा.बाळासाहेब विखे पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब लोंढे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमात हारदे बोलत होते. पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब लोंढे यांच्या ६७ वर्ष पूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याच आयोजन केले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाचा गाडा चालवत असताना समाजसेवेचा वसा घेत तळागाळातील लोकांना आपलेसे करून गावातील व परिसरातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात धन्यता मानल्याने त्यांचा कोल्हार खुर्द येथील ग्रामस्थांनी भाऊसाहेब लोंढे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करून त्यांच्या कामाची पावती दिल्याची साक्ष या ठिकाणी दिसून आली. गावातून लोंढे यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन संपुर्ण गावातून त्यांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना गावाने शुभेच्छा दिल्या.

राजकीय संघर्षातून तावून सुलाखून निघालेले लोंढे यांचे कर्तृत्व गावच्या विकासासाठी फार मोलाचे ठरले असल्याचे रामनाथ शिरसाठ यांनी सांगितले. यावेळी लोंढे यांच्या पत्नी पं. स.सदस्य कमल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र लोंढे, बबनराव शिरसाठ, प्रकाश शिरसाठ, धनंजय पाटील, राजू वरपे, सोहळा समितीचे कार्याध्यक्ष संदीप बनकर, अनिल पाटील, अकबर शेख, प्रदीप भोसले, अनिल मुसमाडे तसेच लोंढे कुटूंबीय उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या