राहुरी / बाळकृष्ण भोसले - सध्या रेशनकार्ड धारकांना रेशन घेण्यासाठी ठसे घेणाऱ्या यंत्राला रेंज नसल्याने दिवसभर रेशन दुकानावर थांबावे लागत असल्याने रोजगाराला मुकावे लागते. तांदूळ, गहु घेऊन त्यासाठी लागणाऱ्या तेल मिठाचे काय असा प्रश्न गावागावातून गोरगरिबांना पडला आहे. रेशन दुकान महिन्याच्या मध्यानंतर सुरू ठेवावे तसेच या महिन्यातील कोटा वाटप मार्चमध्येही सुरू ठेवावे व मशीनला नियमित रेंज असावी अशी मागणी सध्या गोरगरीब जनतेकडून होत आहे.
रेशनदुकानावर महिन्याच्या शेवटी धान्य येते व महिना अखेरपर्यंतच हि दुकाने सुरू ठेवली जातात. या चार पाच दिवसात या दुकानांवर तोबा गर्दी होते. त्यात ठसे घेणाऱ्या मशीनची रेंज दिवस-दिवस गायब असते. आता रेंज येईल मग रेंज येईल याची वाट पाहत गोरगरीब मजूर पुरुष व महिला दिवसभर थांबून असतात. मात्र रेंज नसल्याने त्यांना परत जावे लागते. दुसऱ्या दिवशीही परिस्थिती वेगळी नसते. पर्यायाने त्यांना रोजगाराला मुकावे लागते. मिळणाऱ्या गहु, तादुळाचे करायचे काय? याला तेल, मिठ, मिरची रोजगाराअभावी आणायची कुठून हा प्रश्न या जनतेतून विचारला जात आहे. स्वस्त धान्य दुकानदारही या समस्येने त्रस्त असून जनतेच्या रोषाला त्यांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. काही दुकानदारांना तर शिव्यांच्या लाखोलीबरोबर महिलांच्या प्रचंड असंतोषाला सामोरे जावे लागत आहे. मात्र त्यांना हा त्रास निमुटपणे सहन करण्यापलीकडे गत्यंतर नाही.
सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी मजूरवर्ग निमुटपणे दर महिन्याला हा त्रास सहन करत मिळेल तो शिधा प्राप्त करण्यासाठी चारपाच दिवस स्वस्त धान्य दुकानावर रेंजची वाट पाहत थांबून राहतो. मात्र लाल फितीचा नेहमीचा कारभार निमुटपणे सहन करण्याशिवाय गोरगरिबांना पर्याय नाही गावागावात फेरफटका मारल्यानंतर या जनतेतून नेहमी रेशनचा प्रश्न विचारला जातो. मात्र ना लोकप्रतिनिधी ना प्रशासन यावर आजपावेतो समर्पक उत्तरे देवू शकले नसल्याचे जनतेतून सांगण्यात येते.
यासाठी महिन्याच्या १५ तारखेपासून स्वस्त धान्य दुकाने सुरू ठेवावीत व ठसेयंत्राला नियमित रेंज असावी. अन्यथा या सर्वसामान्य जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
सर्वसामान्य गोरगरीब जनता रेशनसाठी दिवसभर ताटकळत बसत आहे. प्रशासनाने रेशनधारकांसाठी पहिल्याप्रमाणे महिन्यात १५ दिवस दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश द्यावेत. बरोबरच अद्ययावत मशीन द्याव्यात. जेणेकरुन रेंजची अडचण येणार नाही यासाठी तहसीलदारांचे लक्ष वेधणार आहे._ सचिन लाटे, शिवसेना पदाधिकारी चिंचोली
0 टिप्पण्या