अहमदनगर/ जावेद शेख : जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार दि. १२ मार्च, २०२२ रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होवुन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत असे आवाहन जिल्हा सत्र न्यायाधीत तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मा.न्या. सुधाकर वे. यार्लगड्डा यांनी केले. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दाखलपूर्व प्रकरणे व प्रलंबीत प्रकरणे ठेवणेत येणार आहे. सदरचे लोक अदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील. तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणा-या लोकअदालती देखील ब-याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. आपआपसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आलेले आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, विज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रक्रीया संहितेच्या कलम ३२० नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्हयांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे तसेच बँक व मोटार विज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच महानगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुली प्रकरणे ठेवण्यात आलेली आहेत. पक्षकारांनी आपसी समजोत्याकरीता ठेवुन ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.
ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या