कु.प्रतिक्षा कोते हिने श्रीरामपूरचा नावलौकिक वाढविला - सौ. गागरे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील दळवी वस्तीवरील कु.प्रतिक्षा शिवाजी कोते हिने चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात श्रीरामपूरचा नावलौकिक सर्वत्र वाढविला असून तिची आई सौ.मंगल कोते / शिंदे आणि वडील शिवाजीराव कोते यांचे त्यामागे मोठे योगदान असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.नंदाताई शंकरराव गागरे यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कु.प्रतिक्षा कोते हिच्या आईवडिलांचा गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी सौ.नंदाताई गागरे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सल्लागार माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी साहित्य, नाट्य, चित्रपट, प्रसारमाध्यमे आणि लोककला यांच्या जडणघडणीत श्रीरामपूरमध्ये अनेकांनी योगदान दिले, देत आहेत, कु.प्रतिक्षा कोते यांनी आपल्या कौशल्यपूर्ण अभिनयाने चित्रपट, नाट्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर झेप घेऊन श्रीरामपूरचे नाव उज्ज्वल केले, त्यांचे आईवडील निश्चितच गौरवास पात्र आहेत. शिवाजीराव कोते हे उंदीरगावचे असल्यामुळे आमचा मित्र जिव्हाळा समाधान देणारा आहे, आपल्या मुलीसाठी स्वातंत्र्य देणारे आईवडील आणि त्यांच्या मदतीमुळे प्रतिक्षा यांना मनमोकळे आकाश मिळाले, असे आईवडील सर्वांना लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून त्यांचा सत्कार केला.

यावेळी माजी प्राचार्य डॉ.शंकरराव गागरे, शिवाजी कोते, सौ.मंगलताई शिंदे /कोते यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य टी.ई.शेळके यांनी शिवाजीराव कोते तर सौ.नंदाताई गागरे यांनी सौ.मंगलताई कोते /शिंदे यांचा सत्कार केला. सौ.गागरे यांनी मनोगतात पुढे सांगितले की, मंगलताई शिंदे /कोते यांनी अपंग असतानाही आपल्या प्रतिकूल परिस्थितीतही मुलीला शिकविले, तिच्या कलागुणांना वाव दिला. अशोकनगर येथील भास्करराव गलांडे पाटील हायस्कुलमध्ये शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे नोकरी केली. आदर्श कुटुंब आणि आदर्श कन्या हे समाजाला भूषणावह असल्याचे सौ.गागरे यांनी विविध आठवणीतून सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके यांनी कु.प्रतिक्षा कोते हिचे कौतुक करून श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेज आणि शैक्षणिक क्षेत्राला दिशादर्शक असे प्रतिक्षा हिचे व्यक्तिमत्व आहे.

'सोयरीक' चित्रपटातील तिची महिला पोलीसाची भूमिका कौतुकास्पद आहे. ती सध्या दिल्ली येथील नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा येथे चित्रपट प्रशिक्षण घेत आहे. तिने आपल्या स्वकर्तुत्वाने ही वाटचाल केली आहे, करीत आहे. शिवाजीराव कोते हे मुळा प्रवरा संस्थेत कार्यरत होते, पण नोकरी नसतानाही काही कामे करून उदरनिर्वाह करीत या आईवडिलांनी प्रतिक्षाला घडविले हे आदर्शवत आहे. श्रीरामपूरला असा परिवार गौरवपूर्ण असल्याचे प्राचार्य शेळके यांनी सांगितले. सौ.मंगलताई कोते /शिंदे यांनी ह्या सत्काराबद्दल आनंद व्यक्त करीत कु.प्रतिक्षा कोते हिच्या बालपणापासूनच्या आठवणी आणि अभिनयातील धाडसीपणा सांगितला. आमच्या मुलीमुळे आमचा सर्वत्र गौरव होतो आहे.

शिवाजीराव कोते म्हणाले, डॉ.उपाध्ये हे माझे उंदीरगावचे मित्र आहेत. त्यांची वाचन संस्कृती आम्हाला आनंद देते, ह्या प्रतिष्ठानतर्फे प्राचार्य शेळकेसाहेबांनी, गागरे परिवाराने सत्कार केला. मुलीमुळे आम्ही प्रकाश झोतात आलो, मुलगी ही घराची शोभा आणि प्रतिष्ठा असते. मुलीचा जन्म हा सर्वात आनंददायक असल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत, आमची मुलगी ध्यासाने, धाडसाने वागते. ती विमानाने आणि आधुनिक वाहनातून सहज प्रवास करते, ती अनेक भाषा सफाईदार बोलते, अनेकांना मदत करते, संयमी आणि नम्रपणा या गुणामुळे ती चित्रपट क्षेत्रात सर्वपरिचित झाली आहे. मी कधी भाषण करीत नाही पण डॉ. उपाध्ये यांच्यामुळे मी प्रथम बोललो कारण त्यांनी मुलगी हीच वंशाची दिवा असल्याचे सांगितले. आईवडिलांनी आपल्या मुलीबद्दल बोलले तर तिचे मनोबल वाढेल त्यामुळे यापुढे मी आता बोलत राहील असे सांगून सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या