कारण संपलं की कार्य संपते, कारणाच्या नाशात कार्याचा नाश होतो - हभप रामराव ढोक महाराज


कै. सत्यभामा जनार्धन हाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त हरीकिर्तन व सर्व रोग निदान शिबिर संपन्न

विलास लाटे/ पैठण :  मीपणा, वासना, कर्म ही जन्माची कारणे आहेत. जन्म आहे म्हणून मृत्यू आहे. मृत्यू आहे म्हणून यमाची याचना आहे. ज्याला शरण जा म्हणतो तो जन्माची कारण संपवतो‌. कारण संपलं की कार्य संपते. कारणाच्या नाशात कार्याचा नाश होतो. कारणाचा नाश केला की, कार्याचा नाश होतो. असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांनी केले.

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरपंच प्रतिनिधी तथा शिवसेना तालुका उपप्रमुख मनोज पेरे, नगरसेवक विकास गोर्डे यांच्या आजी कै.सत्यभामा जनार्धन हाडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी (दि.१) रोजी आयोजित किर्तनरुपी सेवेत ते बोलत होते.

पुढे बोलताना ढोक महाराज म्हणाले की, पहीली गोष्ट मरण विसरू नका आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधी विसरू नका. आपण जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आपल्याला कधीच विसरत नसतो, असेही ते म्हणाले. त्यामुळे चांगले कर्म करा, आईबापांचा सांभाळ करा. आई-बाप म्हतारपणचे देव्हाऱ्यात लावलेली एक पणती असते. त्या पणतीचा फार प्रकाश नसतो. मात्र ती पणती अख्ख्या घराचं मंदिर करते. एकदा पणती विझली की मंदिरातून देवाची मूर्ती काढल्यासारखे वाटते. मग केवढाही मोठा फोटो लावा काही उपयोग नाही. असा मौलिक उपदेश ही त्यांनी याप्रसंगी उपस्थित श्रोत्यांना दिला.

दरम्यान याप्रसंगी सरपंच प्रतिनिधी मनोज पेरे व नगरसेवक विकास गोर्डे यांनी आजीच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून परीसरातील नागरीकांसांठी नामांकित युनायटेड सिग्मा हाॅस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सर्व रोग निदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला. त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा परीसरातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. त्याचबरोबर कोरोना काळात जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्धच्या लढाईत ज्यांनी महत्वाची भुमिका बजावली असे डॉक्टर, पोलिस कर्मचारी, पत्रकारांसह विविध क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक, राजकीय, शासकीय, व्यापारी आदी क्षेत्रांतील मान्यवरांसह परीसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या