राहुरी : तालुक्यातील त्रिंबकपूर येथील रेखा दगडू आढाव यांच्या शेतावर श्रीरामपूर येथील गोदागिरी फार्म्स ग्रुप तर्फे एकदिवसीय गांडुळखत उत्पादन कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती ग्रुपच्या संचालिका सौ. रुपाली औताडे यांनी दिली.
एक दिवसीय कार्यशाळेत सेंद्रिय शेती, व्हर्मिवाश बरोबरच, शेड न उभारता जमिनीवरच गांडूळखत तयार करण्यासाठी कमीत कमी खर्चामध्ये प्रकल्प उभारणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. गांडुळ खत विक्री बरोबरच, गांडूळ कल्चर, व्हर्मिवाश या विविध उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळतोच परंतु हीच उत्पादने आपल्या शेतीसाठी वापरले तर रासायनिक खत वापरासाठीच्या खर्चात बचत होत असल्याची माहिती रेखा आढाव यांनी दिली.
शेतकऱ्यांकडे गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य व साधने विनामूल्य उपलब्ध असून जमिनीचा कस सुधारण्यासाठी व पिकांची निरोगी वाढ होण्यासाठी गांडूळखत उत्तम पर्याय असल्याची माहिती कार्यशाळेतून मिळाल्याबद्दल प्रशिक्षणार्थी रांजणगाव येथील सुभेदार नारायण जंजाळ, मुसळवाडी येथील बाबासाहेब धुमाळ व अमित धुमाळ यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जगन्नाथ आढाव, अजित आढाव यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यशाळेसाठी शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या