श्रीरामपूर गटविकास अधिकाऱ्यांनी केले उंबरगांव शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक

अहमदनगर/ जावेद शेख : श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेले सूत्रसंचालन, त्यांचे स्वागत करण्याची पद्धत, विद्यार्थ्यांचे सादरीकरण, वर्गाचा नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य पाहून गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

तालुक्यातील उंबरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांनी आकस्मिक भेट दिली असता शाळेतील स्वच्छता व परिसर बघून समाधान व्यक्त केले. दरम्यान गटविकास अधिकार्‍यांनी इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा मोह गटविकास अधिकाऱ्यांना आवरला नाही. त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांकडून मिळवली. वर्गात विद्यार्थी सादर करत असलेल्या मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेतील वैविध्यपूर्ण बातमी पत्राचा आधार घेत बातम्याचा संदर्भ जाणून घेतला असता विद्यार्थ्यांनी तत्परता दाखवत संबंधित चे वृत्त सविस्तरपणे मांडले.

विद्यार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधत असताना मराठी सोबतच अस्खलितपणे हिंदी आणि काही प्रमाणात इंग्रजीचाही वापर करत होते. विद्यार्थी एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख ताई आणि दादा असे करताना दिसून आले. प्रारंभी गटविकास अधिकारी धस यांचे साहित्याचा खजिना दिवाळी अंक भेट देवून विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकल्प स्वतंत्ररीत्या उत्तम मांडणी करून ठेवलेले पाहून धस यांनी प्रकल्पाची अधिक माहिती जाणून घेतली. त्यातील आलेख, विज्ञान प्रयोग, नकाशे तपासले असता विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरी देण्याचा हट्ट धरला. विद्यार्थ्यांमधील एकमेकांबद्दलचा आदर स्नेह तथा गावातील शिक्षणाबद्दलची जागृती बघून गट विकास अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी मच्छिंद्रनाथ धस यांनी मुख्याध्यापिका लताताई पालवे यांचे शाळा व्यवस्थापन व उपक्रमशील वर्गशिक्षक शकील बागवान यांचे वर्गव्यवस्थापना बद्दल कौतुक केले. याप्रसंगी केंद्रप्रमुख संतोष जमदाडे, डॉ. राज जगताप, मेघा साळवे, संघमित्रा रोकडे आदी उपस्थित होते. चर्चेमध्ये विद्यार्थी ऋतुजा राऊत, यश काळे, अजिंक्य राऊत आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी राऊत तर आभार वैष्णवी काळे व सार्थक गुंजाळ यांनी केले. याप्रसंगी गायत्री काळे या विद्यार्थिनीने हिंदी भाषेमध्ये संवाद साधत आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या