राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारीत वाणांमुळे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील कडधान्ये उत्पादक शेतक-यांचे उत्पन्न वाढून विकास होण्यास हातभार लागलेला आहे, असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.
आज गुरुवार दि.10 फेब्रुवारी 2022 रोजी कडधान्य सुधार प्रकल्प येथे जागतिक कडधान्य दीन व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत कडधान्य सुधार प्रकल्प व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक कडधान्य दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित शेतकर्यांना व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगाव येथिल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. कुटे यांनी व्यक्त केले.
जागतिक कडधान्य दिन साजरा...
डॉ. कुटे म्हणाले की, महात्मा फुले कृषि विद्यापीठाने नेहमीच सर्वसामान्य शेतकरी डोळयासमोर ठेवून कायमच संशोधन व कृषि तंत्रज्ञान विस्ताराचे काम केलेले आहे. शेती करत असतांना कृषि निविष्ठांच्या वाढत्या खर्चाबरोबरच मजूरीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे मजूरीवरील खर्च कमी होऊन शेतकर्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकरी बांधवांना दोन पैसे जास्त मिळावे म्हणून राहुरी कृषि विद्यापिठाने यांत्रिक पध्दतीने काढणी करता येणारा हरभर्याचा फुले विक्रम हा महाराष्ट्रातील पहिलाच वाण विकसीत करुन प्रसारीत करण्यात आलेला आहे.
तूर किटकशास्त्रज्ञ प्रा. चांगदेव वायळ यांनी कडधान्य पिकांवरील किडी व रोगांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या पध्दतीचा अवलंब करुन कडधान्ये पिकांवरील किडी व रोगांचे नियंत्रण करावे याबाबतची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पातील प्रायोगीक प्रक्षेत्राला भेट देवून शेतकरी व विद्यार्थ्यांना येथे चाललेल्या संशोधनाबाबत डॉ. मनाजी शिंदे व डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी तांभेरे येथिल प्रगतीशिल शेतकरी ताराचंद गागरे यांनी आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगांव येथील विद्यार्थी महेश भुसारे व कु. कादंबरी सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पाचे हरभरा पैदासकार डॉ.मनाजी शिंदे, मका पैदासकार डॉ. सोमनाथ धोंडे, रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, रोगशास्त्रज्ञ डॉ. सुदर्शन लटके, डॉ. विवेकानंद कुलकर्णी हे उपस्थित होते. यावेळी कणगर, चिंचविहिरे, तांभेरे, ता. राहुरी येथिल शेतकरी व या गावातील तूर उत्पादक शेतकरी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगांव येथील विद्यार्थी उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिर्के हिने केले तर आभार महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. चारुदत्त चौधरी यांने केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. मनोज गुड व प्रा. किर्ती भांगरे हे उपस्थित होते. तसेच डी.बी.टी. प्रकल्पातील डॉ. अरविंद तोत्रे, डॉ. सारीका कोहकडे आणि अक्षय पोटे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.
0 टिप्पण्या