श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : श्रीरामपूर ही आधुनिक युगातील साहित्यनिर्मितीची पंढरी होत असून विविध दुर्लक्षित लेखक, पुस्तकांना प्रकाशात आणले जात आहे, या सेवाभावी चळवळीत सौ.मोहिनी शिवाजी काळे यांच्या आसरा प्रकाशनने प्रकाशित केलेले डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित 'समाजचिंतन' हे पुस्तक ही एक दर्जेदार निर्मिती असल्याचे गौरवोद्गार स्नेहप्रकाश प्रकाशनच्या प्रमुख सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे यांनी काढले.
येथील गुरुनानकनगर मधील आसरा प्रकाशनने डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे 'समाजचिंतन ' हे वैचारिक ललितगद्य पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बेलापूर रोडवरील काळे रसवंती व्यासपीठावर आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ.स्नेहलता कुलथे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी टाकळीभान येथील साहित्य परिवार संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ.सुनीताताई पोपटराव पटारे होत्या. प्रारंभी आसरा प्रकाशनच्या प्रकाशिका सौ.मोहिनी काळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सांगितले की,'समाजचिंतन'ही आमच्या आसरा प्रकाशनची पहिलीच साहित्य निर्मिती आहे, त्यासाठी पत्रकार प्रकाश कुलथे, कवी पोपटराव पटारे, डॉ.शिवाजी काळे, डॉ.बाबुराव उपाध्ये, डॉ.रामकृष्ण जगताप, स्वामीराज कुलथे आणि जाणकार साहित्यिक, पत्रकारांचे सहकार्य लाभले. ना नफा ना तोटा या सेवाभावाने ग्रामीण, दुर्लक्षित साहित्यकांना आपला 'आसरा 'वाटेल म्हणून हे प्रकाशन सुरु केले आहे.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकाने हा प्रारंभ झाल्याबद्दल सौ.काळे यांनी आनंद व्यक्त केला. सौ.मंदाकिनी उपाध्ये यांनी मान्यवरांचा सत्कार केला. डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या पुस्तकाचा परिचय करून दिला. यावेळी सौ. उज्ज्वला रामकृष्ण जगताप, सौ. श्रद्धा स्वामीराज कुलथे, सौ.आरती गणेशानंद उपाध्ये, सौ.अंजली हेमंत पटारे, कु.सुकन्या काळे, कु.भक्ती जगताप, कु.गायत्री काळे, कु.चैत्राली काळे, डॉ. रामकृष्ण जगताप, स्वामीराज कुलथे, डॉ. शिवाजी काळे, पोपटराव पटारे, गणेशानंद उपाध्ये, हेमंत पटारे, सुयश काळे, नील कुलथे, निर्मिक उपाध्ये, कु. श्रेया पटारे आदी उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशन केल्यानंतर सौ.स्नेहलता कुलथे यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, डॉ.शिवाजी काळे आणि सौ.मोहिनी काळे यांच्या विवाहाचा 30 वा हार्दिक शुभचिंतन सोहळा आणि सौ.श्रद्धा कुलथे वाढदिवसाच्या शुभचिंतनप्रसंगी डॉ.उपाध्ये यांच्या पुस्तकाचा प्रेरणादायी प्रकाशन सोहळा संपन्न झाला, हा अमृतशर्करा योग आहे. आपण आपल्या जीवनात पुस्तकांना सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात सौ.सुनीताताई पटारे यांनी डॉ. बाबुराव उपाध्ये, डॉ.काळे दापंत्य आणि सौ.श्रद्धा कुलथे यांना शुभेच्छा व्यक्त करीत सांगितले की डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपले 'समाजचिंतन ' हे पुस्तक लिहून मानवी जीवनमूल्य आणि सदविचार वाचकांना दिले हे कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले. स्वामीराज कुलथे यांनी डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तक निर्मितीचा आनंद व्यक्त करून सांगितले की, डॉ. उपाध्ये यांनी आपले पुस्तक हे सौ.मोहिनी काळे, सौ.स्नेहलता कुलथे, सौ.उज्ज्वला जगताप, सौ. सुनीताताई पटारे, सौ.मंदाकिनी उपाध्ये यांना अर्पण केले आहे. स्त्री सन्मान समाजात वाढला पाहिजे आणि कौटुंबिक जिव्हाळा जपला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सौ.आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सुयश काळे, सुकन्या काळे, गणेशानंद उपाध्ये यांनी संयोजन केले तर डॉ. रामकृष्ण जगताप यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या