प्रत्येक प्राण्यामध्ये एक छुपा नकलाकार दडलेला असतो. जन्मल्यापासून आपण कशाची ना, कशाची नक्कल करतो. मीमिक्री करतो. अर्थातच कॉपी करतो. लहान मुलाला शिकवतानाच मुळात कॉपी करून शिकवावं लागतं. नक्कल करून सांगावं लागतं. पा पा म्हटले की ते कोकरू पा पा म्हणतात मा मा म्हटले की ते बाहुले मा मा म्हणते....सुरु होतो एक प्रवास. जीवनाची परीक्षा हीच सत्य. पण महाविद्यालयीन जीवनामध्ये जेव्हा परीक्षा द्यायच्या असतात, त्यावेळी परीक्षेच्या बरोबर एक विषय येतो आणि तो म्हणजे कॉपी कट्टा
या विवेचनावरून असे लक्षात येईल की आपण सगळेच कॉपीबहाद्दूर असतो का? मग प्रश्न येतो कॉपिला एवढा विरोध का? "कॉपी करणे हा आमचा सिद्धहस्त हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" असं सांगणार एक कार्ट मला भेटल होतं.
मुळात, मुले कॉपी का करतात? विद्यार्थी कॉपी का करतात? विद्यार्थ्यांना कॉपी करायला का भाग पाडले जाते? एका सर्वेक्षणानुसार याबाबतीत मुलांची उत्तरे, अफलातून आहेत. अभ्यास झाला नाही ! लक्षात राहत नाही ! जो अभ्यास केला, ते प्रश्न आलेच नाहीत... लागोपाठ दोन पेपर आले! प्रश्न फार lengthy आहेत, अनंत उत्तरे प्रश्न सोप्या करण्याच्या क्लुप्त्या मात्र भन्नाट असतात ... यावर खरतर संशोधन होऊन पेपर लिहिला जाऊ शकतो त्यावर बोलू आपण कधीतरी...
मी एका महाविद्यालयामध्ये परीक्षा पथका सोबत गेलो होतो. प्रथम वर्षाची परीक्षा असावी... मुलांच्या भाषेमध्ये याला धाड पडली असं म्हणतात. तशीच धाड टाकली होती, काही शिक्षक सहकारी, शिपाई बरोबर होते. दोन पोती भरून कॉपी ( कॉप्या हो कॉपी चे मराठीत अनेकवचन कॉप्याच असतंय ), गोळा केल्या होत्या. आम्ही येतोय म्हटल्या नंतर कॉपी, चिठ्ठ्या, चपाट्या, पुरचुंडी, पुस्तक, पट्ट्या, रायटींग पॅड, असं सगळ धडाधड बाहेर फेकून दिलं होतं. आमची कंबरडी मोडून आम्ही ते गोळा करून ते पोत्यात भरलं होतं. यावर एक प्रयोग केला. दुसऱ्या दिवशी गोळा केलेल्या सर्व कॉप्या प्लास्टिकच्या मोठाल्या थैल्या मध्ये भरून महाविद्यालयाच्या गेटवर एका मंचकावर स्थानापन्न करून ठेवल्या. आणि कालच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या करामती असे त्यावर ठळक अक्षरात लिव्हले. तात्पुरतं कॉपी चे प्रमाण कमी झाले. पण महाविद्यालयाचे कसे असते! दरवर्षी नवे गडी आणि आमचे नवीन राज्य आम्हा शिक्षकांची नजर तशी बेरकी असते, एखादा मुलगा सारखा आपल्याकडे बघतोय म्हणजे दाल में कुछ काला हे! हे कळण्याइतकी हुशार नक्कीच आम्ही झालेलो असतो.
मुले कॉपी करताना दिसतात ती प्रत्यक्ष परीक्षा गृहामध्ये, पण प्रक्रिया सुरू झालेली असते, ती खरं तर बालपणीचे कडूच असते. तो ज्या वातावरणात वाढतो, पालक काय करतात? संस्कार काय होतात? सगळा प्रवास सुरू होत राहतो? आणि त्यामुळे त्याला सगळे जग हे कॉपी करणारे वाटायला लागत असावे. ही पोरे थोर असतात. अर्थात यात मुलीही कमी नाहीत म्हणून मला त्यांचा अवमान करायचा नाही, त्या आपल्यावर कोणी शक करत नाही असे त्यांना वाटत असणार. या सगळ्यात विंदांची एक कविता आठवते , ती म्हणजे, सब घोडे बारा टक्के कॉपीबहादुर यांचे वैशिष्ट्य असते की ती कमालीची आळशी असतात. हुशार मात्र असतात. फक्त हुशारी कुठे वापरायची याचं मतपरिवर्तन झाल्यामुळे यांच्या मेंदूमध्ये भलताच केमिकल लोच्या तयार झालेला असतो. भरकटलेली असतात.
धांदल सुरू होते ती, प्रवेशापासून, काहीच कळत नाही? अकरावीला आल्यावर कला शाखेत जाऊ की, कॉमर्सला जावे? सायन्सला वा कुठला डिप्लोमा करावा ? पालकांची घालमेल होते. शेजारीपाजारी, नातेवाईक कुणीतरी भर घालून हेच कर ! तुला अमुक तमुक ठिकाणी चिटकून देतो, म्हणून त्याला कुठल्यातरी शाखेत पाठवतात. हे चिटकवून देने प्रकरण म्हणजेच नोकरी लावणे. तू फक्त पास हो. या एका वाक्यावर बिचारे प्रवेश घेतात... याचा आणि वर्गात बसण्याचा सुतराम संबंध असतं नाही. महाबेरकी असतात. कुठल्यातरी विचारात गढलेली वा कुडीयोको डाले... कसाबसा वशिल्याने, वा इकडून तिकडून आधारित दबाव टाकून, यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण होते. मग सुरू होतं यांचे स्वतःचे एक ध्यासपर्व. या पर्वात अनेक उलाढाली असतात. जसे अभ्यास करायचा नाही... हा मूलमंत्र. हे ठरलेलेच असतं पण तो का करायचा नाही? कारण सुद्धा सहजपणे मांडता यावी लागतात. यांची तयारी सुरू असते.
मग येतो परीक्षेचा फॉर्म भरण्याची अर्थात आवेदनपत्र भरण्यासाठीचा काळ. हे सूर्यवंशी असतात त्यामुळे सूर्य उगवून गेल्या नंतर, धरण फुटून गेल्यानंतर मग पाणी अडवायच्या प्रयत्नात हे परीक्षेचा फॉर्म भरायला निघतात. सायबर कॅफे वाल्याकडे जाउन (या कामासाठी यांना मोबाईल थोडाच वापरता येतो!) दमदाटी करून मुळात विषय कुठले घ्यायचे हे माहीत नसताना ते भरायचे! क्लार्कला शिपाईला दमदाटी करून फॉर्म भरून घ्यायचा. उशीर झाला म्हणून यांनीच आरडाओरडा करायचा. प्राचार्यांकडे जायचं, विभाग प्रमुखांकडे जायचं, असं सगळं करत एकदाचे गंगेत घोडे न्हाले जाते. आणि परीक्षेचे फॉर्म भरले जातात. कधी कधी विद्यापीठापर्यंत त्यांची मजल जाते वगैरे... मला वाटतं इतकं पुरे! नाहीतर एक प्रबंध व्हायचा.
एकदाची परीक्षा येऊन ठेपते. पण परीक्षा येण्यापूर्वी यांची मात्र जय्यत तयारी सुरू झालेली असते. हे टेलर कडे जातात!, हे सुताराकडे जातात! नाना क्लुप्त्या वापरून कुठे कुठे खिशे तयार करून घ्यायचे अगदी अंडरवेअर च्या पट्टीला वेलक्रो लावून त्यात कॉप्या डकवणारी मंडळी सापडतात. चोरखीसे तर कुठेकुठे असतात... रायटिंग पॅड चा वापर अफलातून करण्यातही पटाईत असतात. पॅड मध्ये चोर कप्पा तयार करून (हल्ली म्हणे तशी विकत पण मिळतात) त्यात मोबाईल ठेवून मोबाईलचा वॉलपेपर आणि पॅडचा वॉलपेपर सारखा करून त्यात तो बेमालूमपणे लावला जातो... अगणित चिठ्ठ्या, चपाट्या, वह्या, पुस्तकं, त्यांचे रिड्यूसड झेरॉक्स (खरंच झेरॉक्स ही कंपनी आहे पण मूळ त्याला फोटोकॉपी असा शब्द आहे ) स्वये, स्वहस्ते, स्वतःला कळतील, अशा काढलेल्या बारीक नाजूक ( त्यांच्या लेखी) सुंदर हस्ताक्षर ह्या सगळ्या शेंदाड शिपायाची तयारी असते. (कॉपी करणाऱ्यांना शेंदाड शिपाई म्हणजे काय? हे कळायचं काही प्रयोजन नाही) इतके महान असतात की कुठली चिट्ठी कुठे ठेवली आहे, हे त्यांना आठवत नाही. काही महाभाग कुठली चिठ्ठी, कुठे ठेवली, याची एक चिठ्ठी करून ती एका कोपर्यात लपवून ठेवतात. आता ती कुठे लपवली हे त्याला आठवतं तो खरा यातला रसिक.
मला तर धोतराच्या शेवाला गाठी बांधून कुठली गाठ कशासाठी बांधली याच्यासाठी शेवटची गाठ बांधणारा तो नाटकातला गोपाळ आठवतो. अशी काहीशी अवस्था यांची असते. आता तंत्रज्ञान बदलत आहे. आधुनिकता आली आहे. मोबाईलवर कॉपी करण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाइल बंदी घातली तरी सुद्धा नको तिथे मोबाईल लपवून आणले जातात. कॉलर ची पट्टी लावण्याचे ठिकाण पाय मोजे, रबर बँड ला बांधुन असे नानाविध अफलातून भन्नाट प्रयोग या मुलांकडून केले जातात...
मुलींना इथे वेगळे समजायचं काहीच कारण नाही या क्षेत्रात त्याही काही कमी नसतात. मागे एकदा एका मुलीने स्वच्छ पांढऱ्या ओढणीवर निळा, काळ्या, हिरव्या लाल रंगाचे फुला फुलांचे डिझाईन असलेले चित्र होतं. खूप बारकाईने एका शिक्षकांनी बघितल्यावर कळलं की ती फुलाफुलांची नक्षी नसून पुस्तकच त्याच्यावर उतरवून आणले होते... (ता. क..इथे कॉपी कशी करायची हे सांगण्याचा हेतू नाही हे सुज्ञांनी समजून घ्यावे या कॉपीज सांगितलेले आहेत म्हणजे पकडलेले आहेत हे ध्यानात घ्यावे) अशा मुलांची वा मुलींची संख्या तशी कमीच असते पण वर्गा गणिक एक-दोन महाभाग असतात हे मात्र नक्की. आपण सगळ्यांनी मिळून एकत्र आलो तर अशा कॉपीबहाद्दरांना पासून वाचू शकतो. त्यांना वाचवू शकतो चला तर झिरो कॉपी अभियान राबवू या...
कॉपी मुक्त परीक्षा देऊयात...
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या