टपोरी कट्टा अर्थात टुकार कट्टा यातील हा दुसरा भाग. लहानपणी आपण प्रत्येक जण खोड्या काढत असतो, पांगाऱ्याच्या बिया घासून दुसऱ्याला चटके देणे, पेन्सिल, रबर, कंपास लपवून ठेवणे, त्याची भंबेरी उडवणे, विनाकारण एखाद्याला टपली मारणे, कुत्र्याची छेड काढणे, विंचवाच्या नांगीला वा भुंग्याला दोरी बांधून काडेपेटीत ठेवून आपल्यापेक्षा लहानग्यांना घाबरवणे... वगैरे वगैरे असे नानाविध अतिरेकी प्रयोग आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलेले असतात. अर्थात हे खोडीवजा असतात. पुढच्या काळात आपण हे विसरून पुढे पुढे जात राहतो... पण याचं प्रमाण जसजसे वाढत जाते तसतसे ते अंगात भिनत जातात, मुरत राहतात आणि म्हणून तो खोडील आहे, तो टुकार आहे, तो टपोरी आहे, वाया गेलेला आहे, ओवाळून टाकलाय! इथपर्यंतची मजल जाते.
सगळेच टुकार, टपोरी, वाईट असतात असे नाही अर्थात टपोरी कोणाला म्हणायचं? टुकार कुणाला म्हणायचं ? हे त्या त्या प्रसंगात अवलंबून राहते. पण एक गंमत असते या छोट्याशा गटामध्ये असा एखादा असतो की जो रोबिनहूडची भूमिका निभावतो. रोबिनहूडची भूमिका म्हणजे काय ? तर दुसऱ्यांना मदत करणे. ही संकल्पना जरी इंग्रजाळलेली वाटली तरी सुद्धा तो श्रीमंतांची घरे लुटायचा आणि गरिबांना त्याचं दान करायचा. आपल्याकडचे विरू बापू वाटेगावकर हे मूर्तिमंत उदाहरण ठरावं, असंच काहीस ह्या गॅंग मधल्या तरुणांचा असतं. त्यात सगळे नसतात सगळ्यांना सगळे कुठे समजते म्हणा जो ही रोबिनहूड ची भूमिका निभावतो तो पुढे आयुष्यामध्ये खूप काही करत राहतो. कारण त्याला मदत करणे ! याची सवय लागून गेलेली असते! अनेक उदाहरणे देता येतील ही मंडळी जी मदत करतात; ती नानाविध प्रकारची असते, जसे एखाद्याने डबा आणला नसेल तर त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था करणे ! सगळ्यांचे बर्थ डे साजरे करणे! ग्रुप मधल्या एखाद्याच्या घरी कोणी आजारी पडलं तर त्याला सर्वतोपरी मदत करणे. किंवा कुठे काही घडलं? कोणाला चक्कर येते! पडला! ग्राउंड वर काय घडलं तरीही? अगदी धावून जाऊन फटाफट मदत करतात... महाविद्यालयाच्या बाहेरचे जीवनही यांचं असच काहीसं असतं. मदतीच्या बाबतीत हे अत्यंत पुढाकार घेतात. दुर्दैव एवढेच की ही संख्या अगदीच दुर्मिळ असतात. धार्मिक उत्सवात माहितीच्या ठिकाणी दुःखाच्या प्रसंगी ही जीव वाळून काम करतात.
बऱ्याचदा परीक्षेमध्ये नापास झालेले असतात. पण यांनी जर मनावर घेतलं तर ही शेवटच्या काही दिवसात अभ्यास करून जुजबी मार्क्स मिळवून पास होतात. तशी जात्याच हुशार असतात फक्त काही वेळा वाहवत गेलेली असतात. पण ठिकाणावर आणणारे घटक जर चांगले भेटले तर ही मुलं आयुष्यात खूप चांगली प्रगती करतात...
मला आठवते की, माझ्या एका शिबिरामध्ये, एका मुलाने कोणाची तरी खोडी काढली म्हणून मी त्याला रागावलो, भर चौकात सगळ्या मुलांमध्ये त्याला लागेल इथपर्यंत बोललो, त्याने थोड्या वेळात त्याची गॅंग तयार केली. दुपारपर्यंत सगळ्यांनी बॅगा घेतल्या आणि निघाले. जातांना म्हणाले "आम्ही शिबीर सोडून जाणार " वास्तविक मी म्हणालो असतो जा! पण तो पर्यंत माझाही राग शांत झाला होता. मी त्याला एकट्याला एकांतात भेटायला बोलावलं आणि काही प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न होता की, "तुला आयुष्यात काय व्हायचे आहे"? हे का करतोय? तो म्हणाला "मला आयुष्यात फुढारी व्हायचे आहे" मग मी त्याला एक गोष्ट सांगितली... समोर एक वाघ १०० गाढवांचे नेतृत्व करत असेल तर ती १०० गाढवे सुद्धा वाघासारखी वागू लागतात.!! पण शंभर वाघांचे नेतृत्व जर गाढव करत असेल तर शंभर वाघसुध्दा गाढवासारखे वागू लागतात... आणि म्हणून तुम्हाला कशाचे नेतृत्व करायचे ते तूम्ही बघा! ही मुलं आज तुमचे ऐकतील पण उद्याचे काय? जेव्हा त्यांना समजेल की तुमच्यामुळे त्यांचे नुकसान झाले तर ती तुम्हाला सोडून देतील. त्याने विचार केला बाहेर गेला चर्चा केली मला म्हणाला की, "सर मला काहीतरी जबाबदारी द्या"? मी लगेच म्हणालो, आजपासून शिबिराचे प्रमुख तुम्ही, तुम्ही म्हणाल तसे आम्ही सगळे ऐकू ! स्वयंपाक कसा करायचा ? काय करायचा? कोणी करायचा? इथपासून श्रमदानाचे काम काय करायचं? गावकरी त्या दिवशी वीस-पंचवीस कामाला आले होते, उद्यापासून कसे जास्त येतील ! सगळी जबाबदारी तुमची. तो अत्यंत खंबीरपणे हो म्हणाला आणि आश्चर्याची गोष्ट त्यांनी शिबीर अतिशय कमालीचं चांगलं आयोजित केले.
आज ते एका गावामध्ये सरपंच म्हणून काम करतात. आणि अतिशय उत्कृष्ट काम करयात. मागच्याच महिन्यात पोपटराव पवारांच्या हिवरेबाजारला जाऊन आल्याचे त्यांनी मला सांगितलं. अर्थात सांगता येणे कठीण असतं की कोण कुठे मोठे झाले. राजकारणी आहेत, प्रथितयश पुढारी आहेत, उत्तम लीडर्स आहेत, काही ठिकाणी नगरसेवक आहेत, आमदार आहेत, चित्रपट क्षेत्रात आहेत, कुठलच क्षेत्र अशा लोकांना वर्ज्य नसते. अर्थात म्हणून आपण रोबिन हूड व्हायचं का? तर मुळीच नाही, ते सांगण्याचा माझा हेतू नाही. माझा हेतू कि या कटटयातल्या मुलांना सुद्धा चांगले वळण मिळाले तर ती चांगली होऊ शकतात हा यामागचा मूळ हेतू आहे.
समाजातली पुढारपण केवळ यामधली मुलं करतात असे नाही. ती सगळ्या थरांमधून येतात. पण या कट्ट्या मधील मुलांना जर वळण मिळाले तर मात्र ती कमालीची यशस्वी होतात. हे मात्र खरं! लीडरशिप क्वालिटी ही यांच्यात उपजत असते फक्त ती वाममार्गाला न्यायची? व्यसनाधीन व्हायचं! आणखीन काही हे ज्याचे त्याने ठरवावे लागते... या मुलांना बऱ्याच वेळा पॉझिटिव काउन्सिलिंग ऐवजी निगेटिव काउन्सिलिंगची गरज असते. जसे तू पास होऊ शकत नाही? तुला हे जमू शकत नाही? तुझ्या कडून हे होणारच नाही? याला निगेटिव सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग असे म्हणतात. निगेटिव्ह स्ट्रोक यांच्या मनाला खूप बोचतो आणि मग ही कामाला लागतात. मला जमत नाही म्हणजे काय? अशी त्यांची धारणा होते आणि काहीही करून ते करण्यासाठी धडपड करतात. म्हणूनच अशी मुलं आपल्याला ओळखता आली पाहिजेत. त्यांना योग्य ती वागणूक दिली गेली पाहिजे. मग आपण या मुलांना पुढे नेऊ शकतो.
प्रत्येक समाजामध्ये सर्व प्रकारचे घटक असावे लागतात. जसे कवी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर, शिक्षक, पुढारी, राजकारणी, समाजकारण करणारे, भांडकुदळ अशी सर्व प्रकारची माणसं समाजात असावी लागतात. पहिल्या बाकावर ची मुलं कदाचित इंजिनियर, डॉक्टर किंवा प्रथितयश (रूढ अर्थाने) काहीतरी होतील. परंतु म्हणून मागच्या बाकावर ची मुले काहीच करत नाहीत असे नाही. ती बऱ्याचदा उद्योजक होतात पुढारपण करतात, राजकारण करतात, शिक्षा म्हणून बाहेर उभा केलेला मुलगा कदाचित आर्मी मध्ये ऑफिसर होऊ शकतो! आणि शिक्षा म्हणून पळायला लावलेला मुलगा हा खेळाडू म्हणून उदयास येतो! त्यामुळे प्रत्येक मुलामध्ये काही ना काही टॅलेंट असतं फक्त ते टॅलेंट कळणारा रत्नपारखी असावा लागतो. चला तर रत्नपारखी होऊयात!
रत्नपारखी फक्त शिक्षकच असतील असं नाही, ते विद्यार्थ्यांचे आपापसातले मित्र असू शकतात, पालक असू शकतात, समाजातले इतर घटक असू शकतात काय लागतं तर appreciation of beauty सगळे चांगलेच वागले पाहिजे अशी धारणा आपली असून चालणार नाही. म्हणून जो जे वांछिल तो ते लाहो ज्याला जसं वागायचं तसं वागू द्यावं पण ती पुढच्या काळामध्ये महाविद्यालयात असताना मात्र त्यांना योग्य दिशेला न्यावी लागतात. हे आपलं कामच आहे
चला तर रोबिनहूड ओळखूयात त्यांच्याकडून चांगली काम करून घेऊयात.
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या