आनंदी कट्ट्यातील एक महत्त्वाचा पैलू आहे आणि तो म्हणजे विनोद. विनोद हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. महाविद्यालय तरुणांमध्ये विनोदी असण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असते. आजचा विषय विनोदी कट्टा काही मुलं, खूप सहज विनोद करून जातात तर काहींना विनोद चटकन कळतच नाही किंवा तो कधीच समजत नाही. असे म्हटले जाते की टवाळा आवडे विनोद हे काही अंशी खरं असेल. पण संत रामदासांनी मुर्खांची लक्षणे सांगताना
टवाळां आवडे विनोद |
उन्मत्तास नाना छंद |
तामसास अप्रमाद | गोड वाटे |
मूर्ख होये नादलुब्धी |
निंदक पाहे उणी संधी |
पापी पाहे पापबुद्धि | लाऊन आंगीं |
असे म्हटलेले आहे.
यात विनोद करणारा टवाळ असा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. परंतु विनोदाच्याही नानाविध पातळी असतात. कुठला विनोद कधी? कुठे? कसा सांगायचा? यालाही मर्यादा असतात. स्मशानामध्ये विनोद सांगून चालत नाही. अर्थात आयुष्य म्हणजे फक्त विनोद असं नसतं, तर निखळ मनोरंजन, निखळ आनंद, यासाठी विनोद सांगितले जातात. ताण हलका करण्यासाठी ताणविरहित जीवन जगण्यासाठी विनोदाची पखरण केली जाते.
लहानपणी, मी एक विनोद सांगू का? मी एक गंमत सांगू का? म्हणून ज्या सहजतेने विनोदआपण सांगायचो. तसं काहीस झालं पाहिजे.
विनोद करावा लागतो , त्यावर निखळ, मनमोकळे, सात मजली, गडगडाटी हसता आलं पाहिजे. हेच हसण्याचे वय आहे. अर्थात विनोद हे कुणाच्या व्यंगावर, कुणाच्या दिसण्यावर, कुणाच्या बोलण्यावर असता कामा नयेत. ते निखळ असले पाहिजेत. सर्व प्रकारचे विनोद याच वयात सांगितले गेले पाहिजेत. होय अगदी सर्व प्रकारचे.
आपल्याकडे संत साहित्यापासून तर तमाशा पर्यंत अगदी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विनोदाची सहज सुंदर पेरणी केलेली असते. अगदी कीर्तनातून वारकऱ्यांच्या भारुड, किंवा गवळणी वा इतर कार्यक्रमांमधून याची पुरेशी रेलचेल असते.
दस्तुरखुद्द अत्र्यांनी ज्यांना विनोदचिंतामणी म्हटले त्या 'चिमणराव'कर्त्या चिं. वि. जोशांनी त्यांच्या लेखनाच्या संकलित पुस्तकाला (ज्याचे नाव 'हास्यचिंतामणी' आहे) एक उत्कृष्ट प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी विनोद या साहित्यप्रकाराचे उत्तम परिक्षण केले आहे, आणि विनोदाचे बुद्धिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ, कृतिनिष्ठ, भावनिष्ठ, स्वभावनिष्ठ, तसेच भाषिक, कायिक, शाब्दिक असे विनोद प्रकार आणि ते साधायच्या अतिशयोक्ती, उनोक्ती, अन्योक्ती, व्याजोक्ती, वक्रोक्ती वगैरे पद्धती यांचे उत्तम वर्णन केले आहे. या लेखात त्यांनी विनोद, हास्य आणि हास्यभावना यांच्यातल्या परस्पर संबंधाचा आढावा घेऊन विनोदामुळे निर्माण होणारे हास्य हे भावनेच्या दृष्टीने इतर प्रकारे निर्माण होणाऱ्या साहजिक हास्यापेक्षा कसे वेगळे असते, हेही समजावून सांगितले आहे. पु ल देशपांडे यांची चपखल अशी विनोद शैली, याचबरोबरीने संता आणि बंता चे, चिकू किंवा चिंटूचे, पंचतंत्र मधले विनोद, नवरा बायकोचे विनोद, हत्ती आणि मुंगी वर केलेले विनोद, अर्थात हे नर्म विनोद म्हणूनच घ्यायला हवेत. हे आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक ठरतात.
विनोद नेहमी हलकाफुलका वातावरण मोकळे करणारा, त्या त्या प्रसंगात निभावून नेण्यात पटाईत असावा. एखाद्याला एखादी गोष्ट समजावून कळत नसेल, तर विनोद निर्मिती मधून पण सांगता येते आणि म्हणून विनोद पराकोटीच्या उंचीचा असावा लागतो. त्यात साधेपणा पण असतो. विनोद बुद्धी असायला प्रचंड ताकद लागते, ते येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.
एकदा एका माणसाला विचारलं की, "बाबा का हसतोयस "? तो म्हणाला की, "काल तुम्ही विनोद सांगितलं ना, आज तो मला कळला"! त्यामुळे विनोद करायला अफाट ज्ञान लागते, अचाट बुद्धिचातुर्य असावे लागते, शब्द फेक, शब्दांची निवड, आणि शब्द संग्रह प्रचंड असावा लागतो.
प्रत्येक टीव्ही चॅनेल्सवर हास्य जत्रा, हास्य सम्राट, कपिल शो कॉमेडीची बुलेट ट्रेन, चला हवा येऊ द्या, अशा सारख्या विनोद मालिका आपण केवळ विरंगुळा म्हणून पाहत नाहीत, तर विनोदातून बऱ्याच वेळा बोध दिला जातो, सल्ला दिला जातो, आणि इतरांच्या विनोदाच्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. माणसांनी फक्त गंभीरच राहून कसं चालेल! कायम गंभीर राहणाऱ्या माणसाचं काही खरं नसतं.
देवाने म्हणा, निर्मिक, अल्ला, भगवान ज्याने कोणी हसण्याची कला दिली असेल किंवा डार्विनच्या भाषेमध्ये उत्क्रांतीच्या शोधातून लागला असेल, हसण्याचे कसब हे फक्त मानव प्राण्याला आहे. असं कधी झालंय का?; की दोन म्हशी एकमेकींसमोर आल्यात आणि हे हे, हा हा, ही ही , हू हू करून हसल्यात... मग जर आपल्याला फक्त हसण्याचे कसब दिले असेल, तर आपण हसलं पाहिजे. तोंडाच्या दोन कोपऱ्यातल्या रेषा थोड्या वर नेल्या की स्मायली तयार होते, आणि खाली आणल्या तर दुःख तयार होते चेहरा पडतो. मग या रेखा कायम वर असायला काय हरकत आहे ?
मी तर सातत्याने म्हणतो की, हेच हसायचं, खेळायचं, बागडायचं, अभ्यास करायचं वय आहे. हसलंच पाहिजे, विनोद केले पाहिजेत. मला नेहमी जो पहिल्यांदा विनोद तयार करतो, त्याचं त्याच्या बुद्धीचे खूप कौतुक वाटतं... मागे कोण होणार महाराष्ट्राचा हास्यसम्राट? असा एक कार्यक्रम लागायचा. यामध्ये दीपक देशपांडे, मिर्झा बेग, अजित कोष्टी, ... यांनी मराठीतल्या वेगवेगळ्या भाषांमधून केवढी विनोद निर्मिती केली. गण्या हे पात्र अजितकुमार कोष्टी यांनी नव्याने पुढे आणले. गण्यावर इतके विनोद सांगितले गेले की विनोदी पात्र म्हटले की गन्या असे डोळ्यासमोर येत असे...
कात्रज घाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून छ्त्रपती शिवाजी महाराजांनी मोठे सैन्य चालून येत असल्याचा आभास निर्माण केला आणि सुलतानी सैन्याची हबेलंडी उडवली, हे चातुर्याचे उदाहरण आहेच, पण हा प्रसंग एका प्रकारे विनोदीही आहे. शाहिस्तेखानाचा कात्रज झाला अशी म्हण केव्हापासून प्रसिद्ध झाली...
मित्रहो दिवसभरात कधीतरी हसता आलं पाहिजे!, हसवता आलं पाहिजे! चेहऱ्यावर कायम हास्याचे चित्र, आभास निर्माण करता आले पाहिजेत!
हसुया! हसवू या!
कृत्रिम न हसता, हास्याच्या क्लबला जॉईन न होता, दिलखुलास मनापासून हसले पाहिजे. हास्य आतून आतून आले पाहिजे!
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या