कॉलेज कट्टा: भाग 17

प्रत्येक महाविद्यालयामध्ये चेहऱ्यावर हास्य असणारी, समोरच्याला प्रफुल्लित वाटावं, असं वागणारी, कायम उल्हासित अशी एक जमात असते आणि ती म्हणजे आनंदी कट्ट्यावरची मुलं.
आनंदी कट्ट्या वरची आनंदी जगणारी मुलं शोधायला फार प्रयास करावे लागत नाहीत. ही कायम फुलपाखरा सारखी इकडून तिकडे, तिकडून इकडे, प्रत्येक गोष्टीत आनंद घेत जगत असतात. स्वतः आनंदी असतात आणि आसपासच्या सगळ्यांना आनंदी करत, त्यांचं जगणं चालू असतं.

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानतात. नावे ठेवत नाहीत. रागवत नाहीत, चिडत नाहीत., घेतला वसा टाकत नाहीत. दोष देण्याची वृत्ती नसते, आनंद यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. आनंदी जगण्यासाठी ॲडजस्टमेंट करावी लागते. हे वेगळे सांगावे लागत नाही. ही मंडळी कुरकुर करत नाहीत. जसे एखादा तास झाला नाही, तर शिक्षकांना सांगायला जातात. कॅन्टीन मध्ये एखादा पदार्थ संपला किंवा पाणी संपलं किंवा टेबल स्वच्छ नसेल, तर आदळआपट करत नाहीत, आरडाओरडा करत नाहीत. कारण यांची कॅन्टीन वाल्याशी छान दोस्ती असते.

महाविद्यालयातल्या सगळ्या शिपाई मामाबरोबर यांचं छान जमतं. सगळ्या शिक्षकांशीही जुळतं, त्यामुळे हे आनंदी राहतात. शिक्षक दिसले, प्राचार्य दिसले की अभिवादन करतात. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून म्हणतात, गुड डे, वा नमस्कार करतात. खुल्या दिलाने त्यांचं जगणं चालू असतं. श्रेष्ठ गझलकार भाऊसाहेब पाटणकर यांची जिंदादिली यांना छान लागू पडते.
जिंदादिल राहण्यासाठी कष्ट नसतात, असे नव्हे, ते सोपे असते असे वाटते. पण स्विच ऑन आणि स्विच ऑफ करता येणे जमले पाहिजे. ज्यावेळी जी गोष्ट करायची; त्यावेळी ती करायची.

तासाला बसलं तर तासच करायचा. जेवायला बसले तर जेवणच करायचं, टॉयलेट ला गेल्यावर तेवढेच करायचं. खेळत असताना खेळ खेळायचे, अभ्यासिकेत अभ्यास करायचा, प्रयोगशाळेत प्रयोगच करायचे. म्हणजेच स्वीच ऑन स्वीच ऑफ करता आला पाहिजे. जी गोष्ट करायची त्या गोष्टीचा स्वीच ऑन करायचा, उरलेल्या मेंदूच्या वळ्यांना ऑफ करून टाकायचे. गडगडाटी हसायचं वय आहे, त्यामुळे सात मजली, मस्त हसायचं. विनोद सांगायचे, त्यावेळी विनोद सांगायचे. अभ्यास करायचा, त्यावेळी अभ्यास करायचा. याच वयात हे सगळं केलं पाहिजे. हे करताना बऱ्याचदा ॲडजस्टमेंट करावी लागते. आनंदी जगण्याचे अनेक पैलू आहेत. त्यातला पहिला पैलू ऍडजेस्टमेंट, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा आणि कमालीची जिंदादिली आपण वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा करणार आहोत. खाली लिहितोय तो ॲडजस्टमेंट हा सर्वांचा कळस होय.

माणूस मेला की त्याची बॉडी होते. बॉडी आली का? घाई करा फुगेल, फुटेल, आंघोळ घाला, उरका, सगळ्या ॲडजेस्टमेंट चा कळस मैताच्या वेळेस बघायला मिळतो, जसे नवा कपडा नाही, आरं चालतंय धडुक आण, साजूक तूप नाही ठीक आहे डालडा, तोही नाही रॉकेल चालत, चंदन कसलं मिळतंय, कसलीही लाकडं चालतात, तीही मिळाली नाही तर नुसत्या गोवऱ्यात भागवता येत. गुजरात भूकंपानंतर आम्ही आपत्ती व्यवस्थापनाच्या शिबिरात घेऊन गेलो होतो. सुरुवातीच्या काळात जाळायला लाकडे नव्हती आणि म्हणून एकेका टायरमध्ये 2-2, 3-3 प्रेत जाळावी लागली होती. हा तर ॲडजस्टमेंटचा महामेरू ठरावा, सोन्याचा मणी नाही घशात घालायला, विड्याच पान चालत, ते नसल्यास तुळशीचं पान आहेच की इथे सगळ्याला पर्याय उपलब्ध असतात, कारण मेलेल्याची आकड नसते. आधीच त्याची बिचाऱ्याची आकडी वळलेली असते‌.

हे सगळं माहीत असूनही जिवंतपणी आपण मला असच लागतं आणि तसचं लागतं करत असतो. अगदी ताटात लिंबू फोड इकडं तिकडं झालेली चालत नाही, मेतकूट वा लिंबलोन नाही म्हणून ताट भिरकवणारे भेटतात की नाही. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की change is the only constant thing in life. पण system रन होताना थोडाही बदल सहन करायचा नाही. अगदि चाकोरीत झापड लावूनच जगायचं, याने दुःख वाढत राहते...

माणूस मेला की नाही, हे चेक करण्याच्या पद्धती नव्हत्या त्या काळात, बघा गंमत येईल वाचताना. प्रेताला आंघोळ गरम पाण्याने घालायची, त्यात वीसन नको कारण
चटके बसल्यावर उठून बसला तर बसला. तोंडात मणी सरकवायचा कारण पडजीभ श्वास नालिकेवर अडलेली असेल तर झाला मोकळा श्वास तर झाला. तिरडीवर करकचून बांधायचं, काचल्यामुळे उठला तर ठीकच,
विसाव्याच्या ठिकाणी खांदेकरी बदलायचे प्रत्येकाने खरच मेलाय का म्हणून चेक करायचे. confirmation म्हणून एक दगड तिथं टाकायचा, प्रेत सरणावर ठेवल्यावर प्रत्येकाने पाणी तोंडात घालून, पुन्हा एकदा confirm करायचे खरच मेलाय म्हणून, सरण रचताना काळजी घ्यायची, अग्निडाग देताना धग, चटका आच लागल्याने झटका बसून उठून बसला तर विझवण्यासाठी मडक्यात पाणी घेऊन माणूस तयार ठेवायचा... आहे ना गंमत...

आता माणूस मेलाय हे ECG ची line सरळ आली की मेला हे कळत, आता आपण जे करतो ती फक्त कर्मकांड उरलीयत. आता प्रेतयात्रा, सरण, विधी हे सगळ इव्हेंट झालाय, मेल्याचे दुःख खरच कितीजणांना हा प्रश्न पडावा, स्मशानात शिळोप्याच्या गप्पा, whatsapp तर हवेच, माणूस जेव्हढा लौकिक अर्थाने मोठा तेव्हढी रडारड कमी होतीय, हाही ॲडजेस्टमेंटचा भाग असावा...

चला या धकाधकीच्या जीवनात आतापासून छोटया ॲडजेस्टमेंट करूया!! जसे भाजीत मीठ कमी पडलय, ठीक आहे, वानगीदाखल मीठ पुरे... कितीतरी गोष्टी सांगता येतील. आरडाओरड न करता, चिडचिड न करता, ॲडजस्ट करायचं...
श्यामची आई मध्ये, साने गुरुजी खूप छान सांगतात. भाजीला मीठ नसताना त्यांचे वडील त्याला गप्प राहायला सांगतात आणि बिना मिठाचा स्वयंपाक त्यादिवशी खाल्ला जातो. नंतर शामला सांगतात की, "अरे तिने फार कष्टाने केलेले" एक दिवस मीठ न खाल्ल्याने फार काही बिघडत नाही... खरं तर काहीच बिघडत नाही. मला वाटतं ही शिदोरी ज्यांना मिळते त्यांना ॲडजेस्टमेंट करणं जमतं. मग हे कुठेही फिट्ट बसतात. बऱ्याच वेळा अपमान सहन करावा लागतो. सहन करायचं म्हणजे गप्प बसायच असं नव्हे, पण त्या त्या क्षणी समोरच्याचा राग शांत होईपर्यंत, शांत बसायचे. आपण आनंदी राहायचं... ताण नाही घ्यायचा, मस्तीत जगायचं,---
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकायचं आनंदी राहणाऱ्यांना मजा करता येते. त्यांच्या शब्दात मज्जा करता येते, म्हणजे एखाद्या बापाच्या कडेवर लहान मूल दिसलं आणि ते आपल्याकडे बघत असेल तर जीभ दाखवून त्याला वाकुल्या दाखवावे, व्हावे लहानसहान लान ... 

मुंगी होऊन साखर खावी... असे म्हणतात जमलं पाहिजे दोस्तहो, प्रत्येकाच्या डोक्यात प्रचंड दुःख भरलेलं असतं पण आपल्याला तरीही आनंद वाटता आला पाहिजे. आनंद हा दुसऱ्याला देता आला पाहिजे. आनंदाच वाण वाटता आले पाहिजे. आनंद वाटल्याने आपला आनंद द्विगुणित होतो, आपण आणखी आनंदी होतो. आपण हसलो आणि समोरचे चार हसले तरीसुद्धा आपल्याला खूप बर वाटत. बरे वाटणे हे आपलं जगणं वाढवतं. जीवन कसा जगला याला महत्त्व आहे तर मग ते आनंदी का नाही जगायचं ? नाही दुःख करत बसायचं, दुःखाला कवटाळत बसायचं नाहीच. गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. बऱ्याचदा आपण गोष्टींना धरून ठेवतो. एकदा का सोडायची सवय झाली की बरेच प्रश्न सोडून दिले की सुटतात. प्रश्न सोडून देता आले पाहिजेत. मित्रहो आनंदी जगण्याचा हा कट्टा आणखीन लांबणार आहे. त्यामुळे चला तर आनंदी जगूया, ॲडजस्टमेंट करूया, आनंदी जगायला भाग पाडूया.

ज्ञानसुत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या