बऱ्याच वर्षांपासून पाहतो आहे, काही विद्यार्थी केबिन मध्ये येतांना आत येऊ का? किंवा "मे आय कम इन"? म्हणताना असा सूर लावतात, इतका रडवेला सूर, चेहरा इतका पडलेला, की त्यांच्याकडे बघून जगण्यावरचा आपला ही विश्वास उडून जावा!
आजचा चर्चेचा विषय आहे नैराश्य किंवा दुःखी कट्टा.
प्रत्येक महाविद्यालयात दुःखी चेहऱ्याने फिरनारी, एकटी एकटी राहणारी, काही मंडळी असतात, संख्येने बर्यापैकी कमी असतात. यांना ओळखण्याच्या खुणा म्हणजे, कायम दुर्मुखलेले चेहरे, पडलेले खांदे, नजर सातत्याने जमिनीचा वेध घेणारी, कसलीही घाई नाही, गडबड नाही, गोंधळ नाही, यांच्या आयुष्यात काही घडते की नाही? अशी शंका यावी अशी ही मंडळी असतात. कायम कसल्यातरी विचारात गर्क झालेली, कुठेतरी हरवलेली, घाबरलेली, शून्यात खोलवर नजर ठेउन बसलेली, अत्यंत निराशावादी, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हरवून बसलेली, अत्यंत नकारात्मक असलेली. वर्गात बसली तरी लक्ष भलतीकडे ठेऊन असतात.
यांच्या जवळून कसलीही सकारात्मक ऊर्जा मिळू शकत नाही. यांच्या लेखी सगळे जग कायम वाईटच असतं. यांचे एक वैशिष्ट्य असते आणि ते म्हणजे हे दुःखाच्या छोट्या-छोट्या पुरचुंडी तयार करतात. त्या पुरचुंडी चे भले मोठे गाठोडे करून, ते मणामणाचं ओझं डोक्यात घालून ठेवतात. सवड मिळेल तशा या पुरचुंड्या सोडवत बसतात. नुसते सोडवत बसत नाहीत तर, समोरच्या चार जणांना या गाठोड्यातील दुःखाच्या कहाण्या चार चौघात सांगून आणखी काही जणांना दुखी करतात. स्वतः दुखी राहतातच पण इतरांना दु:खी करण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यांचे एक वैशिष्ट्य असतं, ते दुःखाच्या खालच्या पायरीवर उभे असतात, वर पायरीवर असलेल्या काही जणांना त्या पायरीवर ओढून, ओरबडून आणतात आणि स्वतःच्या दुःखात सामील करून घेतात.
दुसऱ्याचे सुख त्यांना बघवत नाहीच. सुखी राहण्याच्या यांचा कसलाच मनसुबा यांच्याकडे नसतो.... यांच्याकडे कायम दुःखाचे सदरे एकावर एक घातलेले असतात. सगळे जग नैराश्याने भरलेल आहे अशी यांची धारणा असते. अगदी चिंतातुर जंतू असतात. यांच्या लेखी कोहली किंवा धोनीला क्रिकेट खेळता येत नाही, ते त्यालाही नावं ठेवतात. यांच्या लेखी जगातला अर्थतज्ज्ञ सुद्धा ते स्वतःच असतात आणि दुसऱ्याला कशी अक्कल नाही आणि स्वतःलाच कशी आहे या भ्रमात त्यांचा भोपळा गरगरून भरलेला असतो. कुठे जेवायला गेले तरी पहिले काम ते असे करतात की जेवणाला नावे ठेवतात. जेवण कसे वाईट आहे!, तेलकटच आहे, केसच आलाय! झुरळासारखे काहीतरी दिसतेय ! असे दुसऱ्याला किळस आणणारे काहीही.
एखाद्याने उत्तम ड्रेस घातला असेल तरी ते त्याला, काय अंडीवाल्या सारखे घातले ! असे म्हणणार व समोरच्याला शरमेने मान खाली घालायला लावणार. प्रत्येक गोष्टीत कसली तरी खोट काढणारच. चांगलं काहीच दिसत नाही यांना.
याचं कारण, निराशावाद मस्तकात ठासून भरलेला असतो. अभ्यासात तशी ही मंडळी यथातथाच असतात. स्वतःला मात्र खूप हुशार तज्ज्ञाचा आव आणून स्वमग्न अवस्थेत स्व:तच्या विश्वात अखंड बुडालेली असतात. ही मंडळी कधीकधी टोकाचं पाऊल उचलतात. यांचे प्रमाण कमी असलं तरी हे वाढता कामा नये, मित्र म्हणून आपली जबाबदारी असते. बऱ्याच वेळा ही मंडळी व्यसनांच्या आहारी सुद्धा गेलेली असतात. कायम काही ना काही चघळत असतात. तो त्यांच्या वैशिष्ट्याचा भाग असतो.
आपण प्रत्येक जण नैराश्याच्या गर्तेत कधी ना कधी जातो. यातून कोणी सुटत नाही. फक्त त्यातून किती पटकन बाहेर यायचं ! आणि कसं यायचं! हे आपल्याला कळलं पाहिजे! दुःख उगाळत बसले की वाढत राहते. प्रत्येकाच्या आयुष्यात पदोपदी दुःख आलेली असतात. कोणाची आई गेलेली असते वा वडील गेलेले असतात! आजी-आजोबा गेलेले असतात, आपण नापास झालेलो असतो! कसली न कसली अपयश आपल्या पदरी आलेली असतात. पण या गर्तीत किती वेळ राहायचं ! हे आपल्याला ठरवावे लागते. मुळात एकदा का निराशा आली, दुःखाच्या गर्तेत आपण गेलो की त्या भोवऱ्यामध्ये अडकल्यासारखी अवस्था होते.
सगळे जग आपल्या वाईटावर टपून आहे अशी यांची मनाची समजूत होते. मुळात ही मंडळी कमालीची असमाधानी असतात. त्यांना कशामध्येही आनंद दिसतच नाही. आनंद घेण्याची यांची प्रवृत्तीच नसते. अभ्यास करतांना सुद्धा मला हा विषय आवडत नाही! तो विषय आवडत नाही; यांच्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी काम न करण्याची कारणे तयार असतात. मी आज अभ्यास का केला नाही तर अमुक-तमुक सरांनी माझ्या आवडीचा शर्ट घातला नाही! किंवा आज माझ्या आवडीची भाजी आईने डब्यात दिली नाही! अशी काय वाटेल ती कारणे यांनी शोधलेली असतात. मुळात दुखी होण्यासाठी यांना कारण लागतेच असे नाही. वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासाठी यांच्याकडे अनंत कारणे असतात, ती त्यांना वेगळी शोधावी लागत नाहीत. आणि म्हणूनच आपण सातत्याने मित्रमंडळींच्या सान्निध्यात राहिले पाहिजे. या दुखी लोकांपासून कसं दूर यायचं आणि दुःखी लोकांना बाहेर कसं काढायचं यावर सुद्धा आपल्याला चर्चा करता आली पाहिजे.
असे मित्र आपल्याला ओळखता आले पाहिजेत! त्यांची मानसिक पातळी आपण समजून घेतली पाहिजे! त्यांना समजावून ते जर समजत असतील तर ठीक; नाहीतर त्यांच्यापासून दूर राहणे आपल्याला पसंत करावे लागेल. त्यांना कसे सुधरावयाचे याचे वेगळे मार्ग आहेत. त्यावर आपण पुन्हा कधीतरी चर्चा नक्की करूयात!
चला तर चांगले मित्र महाविद्यालयीन आवारात जमविण्यात आपली स्वतःची सकारात्मक विचारांची एक साखळी तयार करूयात !!!
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य: कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य: अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या