एकेकाळचे प्रथितयश उद्योजक डी. एस. कुलकर्णी आमच्या महाविद्यालयात म्हणजे आय कॉलेज इंदापूरला 2012 साली आले होते. एखादा वक्ता स्वखर्चाने हेलिकॉप्टर घेऊन भाषण द्यायला मुलांशी संवाद साधायला येतोय याचं त्याकाळी आम्हाला फार अप्रूप होतं. अर्थातच मी आज बोलणार आहे ते उद्योजक कट्टयाविषयी...
डी एस कुलकर्णी यांनी त्यावेळी मुलांना ते स्वतः गरवारे महाविद्यालयात असताना एफवाय बीकॉम शिकत असताना टेलीफोन पुसण्याचं काम केलं इथपासून त्यांची सगळी भन्नाट गोष्ट सांगत ते कसे अरबपती झाले वगैरे सांगत मंत्रमुग्ध केले. पुढे दुसऱ्याच दिवशी आमच्या महाविद्यालयात कसलातरी छोटासा कार्यक्रम होता, सोमा पिसे नावाचा एक विद्यार्थी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की सर मी फोटोग्राफी चांगली करतो मी म्हणालो अरे वा! आज करा फोटोग्राफी. कॉलेजचा कॅमेरा देतो फुकटात करा. गडी माझ्या तोंडावर म्हणाला "नाही सर" माझा कॅमेरा आणि बाहेर तुम्ही शंभर रुपये देत असाल तर मला पन्नास द्या पण मी फुकटात काम करणार नाही! मला खूप आनंद झाला! आज सोमा पिसे प्राध्यापक म्हणून असले तरी प्रतीथ यश फोटोग्राफर म्हणून काम करतात. एफवाय बीकॉम ला असल्यापासून सोमानी फोटोग्राफी सुरू केले. महाविद्यालयातल्या कामाचे कंत्राट मिळालेच पण बाहेरच्या किंवा आम्हा शिक्षकांच्या घरच्या, कुणाच्या लग्नाच्या, बारशाच्या अनेक उपक्रमांच्या ऑर्डर मिळवत आज त्याच्याकडे स्वतःचा दोन अडीच लाख रुपयांचा उत्तम कॅमेरा आहे.
एक दिवस अनिकेत शिंदे नावाचा विद्यार्थी माझ्या घरी आला आणि म्हणाला सर विदाऊट तेल, विदाऊट तिखट, मासे खाणार का? मी लगेच हो म्हणालो. ते घेऊनच आले होते. त्यांनी मासे माझ्या हाती दिले आणि म्हणाले एवढे पैसे द्या! मी थोडे नाखुशिने दिले आणि विचारलं तर तो म्हणाला की सर मी उद्योजक झालो! रोज सगळ्या जीममध्ये आणि सगळ्या डॉक्टरांना प्रोटिन्स हवेत म्हणून कधी मासे तर कधी फक्त उकडलेले चिकन किंवा उकडलेली गावरान अंडी आणि मागितले तर भोजन अशा पद्धतीने देतो ! खुप छान असे म्हणता म्हणता पुढे दोन वर्षात आणि त्यांनी आज स्वतःचं कॅन्टीन सुरू केले आहे. मेस सुरू केली आहे. त्याच्या हाताखाली जवळजवळ दहा माणसं सध्या काम करत आहेत. मला वाटतं उद्योजकतेचे हे उत्तम उदाहरण ठरावे.
प्रत्येक महाविद्यालयांमध्ये उद्योजकता विकास केंद्र किंवा उद्योजकता कट्टा अर्थात धंदा कसा करावा? व्यापार कसा करावा? व्यवसाय कसा करावा ? या विषयाने मार्गदर्शन होत असते. आपण मराठी माणसे आपल्याकडे म्हण आहे तो धंद्यात पडला! सुरुवातच आपण पडला या शब्दांनी करतो; म्हणजे त्याचा धंदा पटल्याशिवाय राहणार आहे का ? वास्तविक आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा. महाविद्यालयीन जीवनात व्यवसाय करणारे, धंदा करणारे अर्थात उद्योजक होणारे त्या मानाने कमीच विद्यार्थी असतात. पण जे असतात ते मनाने भयंकर श्रीमंत असतात. ही मुलं पै न पै चा हिशोब ठेवतात. यांना अकाउंट शिकवावे लागत नाही. आयुष्यात कमालीचे यशस्वी होतात. कारण महाविद्यालयीन जीवनातच यांना काही ना काही उद्योग करण्याची सवय असते. मला आठवते मी आठवीत असताना आम्हाला स्काऊट अँड गाईड मध्ये खरी कमाई नावाची कन्सेप्ट होती. म्हणजे एक रुपया घ्यायचा आणि संध्याकाळपर्यंत त्याचे दोन रूपये करून दाखवायचे. एक रुपयाची बोर विकत घ्यायची त्याचे दोन करायचे त्याचे चार करायचे. असं करत करत संध्याकाळपर्यंत दहा रुपये खरी कमाई करायची दिसते तेवढी सोपी नसते. किंवा कुणाच्या तरी घरी जाऊन डाळ निवडून द्यायचे तुराट्या बडवून द्यायच्या. भांडी घासून, घर स्वच्छ करून द्यायचं अशा कामात जे पैसे मिळत ती खरी कमाई असत अर्थाचा कमवा शिका चा भाग जरी असला तरी यात बऱ्याच वेळा उद्योजकता असे. एकदा नववीत असताना भज्यांची गाडी लावली होती. उद्योजकतेचे हे बीज कुठेतरी रुजवायला हवे. उद्योजकता आपल्या अंगी ठायी ठायी मुरलेली असते. याला मार्केटिंग स्किल लागतं. आपले प्रॉडक्ट कसे विकायचं? याची अक्कल लागते. अर्थात ही पिढी जात असतेच असे नाही. हे विकसित करावे लागते. काही जणांच्या घरी ती असतेही. पण सगळ्यांकडे नसते.
पण आपल्या प्रत्येकामध्ये एक उद्योजक लपलेला असतो, दडलेला असतो, त्याला वारू सारखं चौफेर घुमू द्यावे.
शिक्षण म्हणजे फक्त शिक्षण घेणं नव्हे या विषयात तर खरी पायाभरणी होते आयुष्याची आणि म्हणूनच प्रत्येकाने आयुष्यात कसला तरी धंदा करावा! व्यवसाय करावा! उद्योजक व्हाव! इतरांना उद्योजक व्हायला भाग पाडावे !
म्हणजे नसलेले प्रोडक्ट सुद्धा विकता आले पाहिजे. किंवा मार्केटिंग मध्ये असे शिकवले जाते की माती सुद्धा विकता आली पाहिजे. त्यातूनच उद्योजकता विकास होतो. माझा कमवा शिका चा एक विद्यार्थी उमेश सल्ले हा खरंतर भूगोलाचा विद्यार्थी एकदा त्यांनी पक्षी निरीक्षणाचे व्याख्यान आमच्या महाविद्यालयात ऐकले आणि पठ्ठ्याने केला की व्यवसाय सुरू, आज लखपती आहे धड मराठी न बोलता येणारा आज उजनी डॅम वर हजारो पक्षांची नावे इंग्रजीत खाडखाड सांगतो. भल्याभल्यांना माहीत नसलेले पक्षी याला माहिती आहेत. पक्ष्यांच्या जीवावर व्यवसाय करतो त्याचे लॉजिंग-बोर्डिंग उत्तम जेवण ते नावेतून फिरवून आणने.
अर्थातच व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर बोलणं. बोलणं गोड असावे लागत. म्हणजेच अत्यंत गोडबोल्या स्वभाव असावा लागतो. पु ल देशपांडे ज्या पद्धतीने सांगतात की कापड विक्रेता विशेषतः साडी विक्रेता हा साड्या दाखवताना कधीही कंटाळत नाही. एखाद्या महिलेने त्याला लेमन रंगाची साडी मागवली तो त्यात परत पन्नास प्रकारच्या लेमन साड्या दाखवतो. किंवा चटणी कलर राणी कलर आपल्याला खरंच माहीत असतात का? पण तो मात्र न थकता, न रागावता, न चिडता हे सगळे दाखवत राहतो.
मराठी माणूस तसा धंद्यात कमी पडतो असे म्हटले जाते पण आता काळ बदलतोय. हळूहळू मराठी माणूस उद्योजकतेकडे आकर्षित होतो आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण उद्योग केले तर! व्यवसाय केले तर! छोटे छोटे व्यवसाय अगदी लोकांच्या गरजेप्रमाणे, वेळ आली तर, लोकांना गरजा निर्माण करून धंदा विकसित करता येतो. लोकांना काय लागतं, नाविन्यता लागते, तीच वस्तू नव्या वेष्टनात विकणे याका कदाचित धंदा म्हणत असतील परंतु लक्षात घेतले पाहिजे की ओरडणाऱ्या चे हुलगे अर्थात कुळीथ विकले जातात अबोलाचे गहू तसेच राहतात. म्हणूनच धंदा करणाऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लागते तर अतिशय मधाळ बोलणं त्याच्याकडे दोन फॅक्टरिंची अत्यंत गरज असते एक म्हणजे डोक्यात बर्फाची फॅक्टरी आणि तोंडामध्ये शुगर ची फॅक्टरी.
महाराष्ट्र उद्योजकता केंद्र अर्थात एमसीडी नावाने पुण्यामध्ये एक केंद्र चालते उद्योजकता नावाचे एक मासिक या एमसीईडी कडून काढले जाते.
आपण सगळ्यांनी छोटेखानी का होईना पण उद्योग केले पाहिजेत अनेक उदाहरणे देता येतील परंतु ते देत हा लेखनप्रपंच वाढवणे माझा हेतू नाही. लांबोटी च्या चिवडे वाल्या आज्जी ची कथा, लातूर मधल्या कुठल्या तरी सुशीला विकणाऱ्या ची कथा अगदी चितळेंची कथा किंवा बेडेकरंचा मसाला कितीतरी उदाहरणे देता येतील. गायतोंडे यांच्या चपला न पासून कोल्हापूरच्या चपला न पर्यंत तर नांदेड रस्त्यावर असणाऱ्या बासुंदी पासून खाण्याच्या जीनंस पासून तर कपड्यांत पर्यंत जोशांच्या वडापाव पासून रेवड्या पर्यत. पुण्यात आबा काळे नावाचा माझा विद्यार्थी मित्र पुणेरी मिसळ नावाने दुकान चालवतो अशी अनेक उदाहरणं देता येतील. अमोल सोनवणे नावाचा विद्यार्थी प्राध्यापक मित्र सध्या चपला विकतो कामाची लाज वाटता कामा नये आणि म्हणूनच आपण धंदा करणाऱ्याला नाव ठेवली नाही पाहिजे त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे अर्थातच आपणही कधी ना कधी व्यवसाय केला पाहिजे त्यातून खूप शिकता येतं शिक्षण मिळतं चला तर उद्योजक बनू या
धंदा करायला भाग पाडू या!
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या