रोपट्यांची वाटचाल वृक्षाकडे; बालानगर येथील घन वृक्षलागवड बहरली


विलास लाटे/पैठण : झाडे लावणे सोपे आहे, मात्र त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही सोपी गोष्ट नाही. अनेकदा झाडे लावण्याचा उपक्रम मोठ्या थाटात पार पडतो. हे फक्त लागवडीपुरतेच मर्यादित राहते. त्यानंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परीणामी हजारो-लाखो रोपटे जळून खाक होते. याची प्रचिती बहुतेक सर्वांनाच असावी. मात्र पैठण तालुक्यातील बालानगर हे याला अपवाद ठरले असून मागील वर्षी करण्यात आलेली घन वृक्षलागवड व्यवस्थितरीत्या संगोपन व संवर्धन केल्याने ही झाडे आज दिमाखात डौलदारपणे बहरली आहे.

मागील वर्षी बालानगर येथे ५ गुंठे क्षेत्रात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश गटणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे, तत्कालीन गटविकास अधिकारी के.एम.बागूल व गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर थोरे, अशोक घोडके, चंद्रमुनी ढवळे, सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ, सरपंच वंदनाताई भालेकर, उपसरपंच मच्छिंद्र गल्हाटे यांनी पुढाकार घेऊन घनवृक्ष लागवड केली होती. या झाडांना पाईपलाईन करून महंमद शेख यांनी वेळोवेळी पाणी दिले. छबु शरणागत यांनी वेळोवेळी खुरपणी करून घेतल्या. योग्य नियोजन व व्यवस्थित देखभाल केल्याने ते छोटे-छोटे रोपटे हळूहळू मोठी होऊ लागली असून ती झाडे दिमाखात डौलदारपणे बहरु लागली आहे.

याकामी आसपासच्या नागरिकांचे खुप सहकार्य लाभले. त्यामुळे झाडांचे संरक्षण होऊ शकले. ग्रामपंचायतने खुप कल्पकतेने जागेची निवड करुन एका बाजूने जिनींगची भिंत, एका बाजूने अंगणवाडी इमारत असल्यामुळे फक्त दोन्ही बाजूने संरक्षण उपाय करावे लागले. तो उपाय देखील ग्रामपंचायतने मजुर लाऊन काट्या तोडून अगदी कमी खर्चात काटेरी कुंपन केले. ग्रामविकास अधिकारी जिजाभाऊ मिसाळ यांची बदली झाल्यानंतर नवीन आलेले ग्रामविकास अधिकारी नितीन निवारे यांनी देखील या कामाकडे जातीने लक्ष देऊन ही झाडे जगतील याबाबत काळजी घेतली. म्हणूनच आज या रोपट्यांची वाटचाल वृक्षांकडे होताना दिसत आहेत. याकामी ग्रामपंचायत सदस्य वंदनाताई सोमनाथ भालेकर, कृष्णा थोरात, शाकीर शेख, योगीता गोर्डे, रवींद्र भुजबळ, लीलाबाई गोर्डे, बद्रीनाथ गोर्डे, अलिमुनबी शेख, मुनावर शेख, सुबानबी शेख, शोभाबाई वीर, आरेफ शेख, सैतुनाबी शेख, दिगंबर गोर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या