अपघातातील मृताच्या वारसांना मिळाला न्याय

◾ ३१ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

विलास लाटे/पैठण : मागील अडीच वर्षांपूर्वी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसास न्याय मिळाला असून ३१ लाख ४९ हजार ३१२ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश नुकतेच मोटार अपघात दावे प्राधिकरणाचे न्यायाधीश एस.आर.कुरेशी यांच्या न्यायालयाने दिले आहे.

१५ मे २०१९ रोजी रामेश्वर भाऊसाहेब सोनवणे (रा.वाहेगाव ता.पैठण) हे आपल्या दुचाकीवरून वाहेगाव येथील घरी जात असताना पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील टाकळी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला समोरुन विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली होती. या अपघातात दोन्ही दुचाकी चालकांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन्ही दुचाकी चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोनवणे यांच्या नातेवाईकांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांचे वकील अॅड. बाळासाहेब नवले व अॅड. अनिल बोबडे यांच्या मार्फत चालक-मालक व न्यु इन्सुरन्स कंपनीविरोधात दावा दाखल केला होता.

सुनावणी दरम्यान त्यांच्या वकीलांनी रामेश्वर सोनवणे हे एका खाजगी कंपनीत कायमस्वरूपी कामगार म्हणून नोकरीला होते. त्यांना मासिक ३२ हजार रुपये वेतन होते. ते कुटुंबातील प्रमुख व कर्ते असल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या उत्पन्नावर अवलंबून होता. अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या उत्पन्नाचे साधन बंद झाले. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा युक्तिवाद त्यांच्या वकीलांनी करत समोरील दुचाकी चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला व यात सोनवणे यांचा प्राण गेला असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

याप्रकरणी मोटार अपघात दावे प्राधिकरणाचे न्यायाधीश ए.आर. कुरेशी यांनी सर्व प्रकरणाचे बारकाईने अवलोकन करून सोनवणे यांचा दावा मंजूर केला व चालक-मालक व इन्सुरन्स कंपनीने संयुक्तरीत्या मयताच्या वारसास ३१ लाख ४९ हजार ३१२ रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या