कोल्हार महाविद्यालयात मतदार जागृती दिन साजरा

राहुरी / बाळकृष्ण भोसले - कोल्हार येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार जागृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. चंद्रकांत रुद्राक्ष होते. महाविद्यालयाच्या कॅम्पस डायरेक्टर प्राचार्य डॉ. जयश्री सिंनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. सोपानराव शिंगोटे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. रुद्राक्ष प्रसंगी म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. निवडणूक आयोगामार्फत देशभरातील संसदीय निवडणुकांपासून महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत आदी निवडणुका घेतल्या जातात. या निवडणुकांचे कामकाज सुरळीत शांततेत पार पाडले जावे म्हणून आयोगामार्फत काही नियम घालून देण्यात आलेले आहेत. मतदारांना त्याच्या मतदानाचा हक्क बजावताना कोणत्याही प्रकारची अडचण, अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता या आयोगामार्फत घेतली जाते. राज्य घटनेला अनुसरून आणि त्यात अंतर्भूत केलेल्या तरतुदी वरून देशातील १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार दिला गेला आहे. या नवोदित मतदारांनी निर्भीडपणे मतदान करून योग्य व चारित्र्यसंपन्न सदस्याला निवडून देणे महत्वाचे आहे. जेणेकरून त्यामुळे समाजाच्या विकासा बरोबरच देशाच्या विकासाला त्यांचा हातभार लागेल.

आपण शैक्षणिक क्षेत्रातील पिढी घडविणारे कसबी कारागीर आहोत. त्यामुळे आयोगाच्या या कार्याला हातभार लावताना आपल्यालाही सुसंस्कारित पिढी घडवून एक जबाबदार नागरिक या देशाला प्राप्त करून द्यावयाचा आहे. त्याच्या माध्यमातून देशाची विकासाची गती सातत्याने प्रवाहित राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका संगीता धिमते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. उत्तम येवले यांनी केले. प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका कार्यालयीन सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण तुपे यांनी उपस्थितांना निर्भीड मतदानासाठी शपथ दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या