ढोरकीन परीसरातील नागरिक नेटवर्कच्या समस्येने हैराण

जिओ, व्हिआय नेटवर्क सेवेचा समतोल बिघडला

पैठण : तालुक्यातील ढोरकीनसह परीसरातील गावात मागील एक महिन्यांपासून जिओ, व्हिआय या कंपन्यांचा नेटवर्क सेवेचा समतोल बिघडला असून नेटवर्क वारंवार गुल होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याकडे संबंधित टेलिकॉम यंत्रणेने त्वरित लक्ष वेधून नेटवर्क सेवा सुरळीत करावी अशी मागणी केली जात आहे.

इतर कंपनीच्या तुलनेत जिओ व व्हिआय या दोन टेलिकॉम कंपनीचे ग्राहक ढोरकीन परीसरात मोठ्या प्रमाणात आढळतात. चांगल्या नेटवर्क बरोबरच स्वस्त रिचार्ज प्लान देणाऱ्या कंपन्या म्हणून या कंपन्यांकडे सुरुवातीला पाहीले जायचे. सुरुवातीला चांगली सेवा व स्वस्त रिचार्ज प्लान देवून या टेलिकॉम कंपन्यांनी बहुतांश ग्राहक आपल्याकडे आकर्षित करुन नावलौकिक मिळविले. स्वस्तात अमर्यादित काॅल व इंटरनेट सेवा मिळत असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण इंटरनेटच्या मोहात पडले. आता जवळपास सर्वांनाच स्मार्टफोनची सवय जडली आहे. अनेकजण तर या इंटरनेटच्या एवढ्या आहारी गेलेत की, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल मध्ये व्यस्त असल्याचे दिसून येते. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आता दैनंदिन गरजेच्या यादीत स्मार्टफोनने जागा मिळवली असल्याचे वाटू लागले आहे. स्वस्त इंटरनेट सेवेमुळे असंख्य लोक इंटरनेटच्या जाळ्यात अडकले. याचाच फायदा उठवत टेलिकॉम कंपन्यांनी अचानक रिचार्ज दरांमध्ये भरमसाठ वाढ करुन ग्राहकांना एकप्रकारे शाॅक देवून आनंदावर विरजण पाडले आहे. परंतु आता रिचार्ज दरांमध्ये भरमसाठ वाढ करुन देखील पुर्वीसारखी चांगली सेवा देण्यास या कंपन्या असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे. जिओ व व्हिआयचे नेटवर्क वारंवार गुल होत असल्याची ओरड ग्राहकवर्ग करत आहेत. 

मागील एक महिन्यांपासून तालुक्यातील ढोरकीनसह परीसरातील टाकळी, बोरगाव, कारकीन, ७४ जळगाव, ढाकेफळ, दिन्नापुर आदी गावात जिओ व व्हिआयचे नेटवर्क वारंवार गुल होत असल्याचे प्रमाण हल्ली खूपच वाढले आहे. कधी कधी नेटवर्क असूनही इंटरनेट चालत नाही. चाललेच तर त्याची गती खूप हळूवार असते. फोन लावला तर आवाज येत नाही. आवाज आलाच तर अधूनमधून अडखळत ऐकायला येणे. अशा विविध समस्यांनी ग्राहक वैतागले आहे. याचा फटका बँकिंग सेवा, ऑनलाइन सेवा पुरविणाऱ्या सेवेंनासुद्धा बसत आहे. यामुळे व्हिआय व जिओच्या ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. वाढत्या दरांप्रमाणे टेलिकॉम कंपन्यांनी चांगली सेवा ग्राहकांना प्रदान करावी, अशी अपेक्षा ग्राहक वर्गातून व्यक्त होत असून याकडे टेलिकॉम कंपन्यांनी लक्ष वेधून चांगली सेवा देण्यावर भर द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या