राहुरी / बाळकृष्ण भोसले - इमारत बांधकाम कामगारांपर्यंत त्यांचे हक्क व शासकीय सोयीसवलती पोहोचायल्या हव्यात. निरक्षर व अल्पशिक्षित कामगार या क्षेत्रात असल्याने त्यांना शासकीय योजना माहिती नाहीत. असंघटित कामगार असल्याने त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. यातून या कामगारांना बाहेर काढून त्यांची नोंदणी व संघटन वाढविण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन या मंडळाचे जिल्हा सरचिटणीस नंदू डहाणे यांनी केले.
तालुक्यातील चिंचोली येथे कामगार मेळावा व नोंदणी अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणेश हारदे होते तर उपसरपंच विलास लाटे, अशोक गागरे, शरद आरगडे, सर्जेराव लाटे व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री डहाणे म्हणाले सध्या महामार्गांंचे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तेथे महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागातील मजूर काम करत आहेत. अल्प मोबदल्यात त्यांच्याकडून काम करवून घेतले जाते तसेच त्यांच्या जेवण व राहण्याची व्यवस्था अतिशय तुटपुंजी आहे. या कामगारांना डबाबंद जेवण मिळावे हि मंडळाची प्रमुख मागणी आहे. शासकीय कामातील निविदेतून शासन एक टक्का कपात कामगार कल्याण म्हणून कपात करीत आहे. त्याचाच लाभ कामगारांना देते. मात्र या कामगारांची नोंदणी नसल्याने हा पैसा अखर्चित राहात आहे. त्यानुषंगाने मोठ्या प्रमाणात कामगार नोंदणी करण्यासाठी गावोगावी मेळावे घेऊन कामगार जागृती करीत असल्याचेही ते म्हणाले.
प्रसंगी सरपंच हारदे यांनी नोंदणी करण्यासाठी गावातील कामगारांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जिल्हा समन्वयक जगधने, चिंचोली समन्वयक संतोष ठोंबरे, राकेश बोर्डे, रायभान नलगे, बन्सी भोसले, अशोक सकट, संजय गागरे, भाऊसाहेब त्रिभुवन, संजय भोसले, भास्कर भराडी, प्रविण ठोंबरे, सागर ठोंबरे आदिंसह बहुसंख्य कामगार बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मिठु ठोंबरे यांनी केले.
0 टिप्पण्या