माहेगाव - महाडूक सेंटरला आढळले पाच बछडे; बिबट्याचे की अन्य प्राण्याचे ? वनविभागच संभ्रमात

आरडगाव/ राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील माहेगांव महाडूक सेंटर परिसरात पांडुरंग देठे यांच्या उसाच्या फडात ऊस तोडणी कामगारांना पाच बछडे आढळून आल्याने ऊस तोडणी कामगार व शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

दरम्यान या घटनेची महिती वनविभागाला देण्यात आली. संबंधित वनमजुरांनी बछड्यांची पाहणी केल्यानंतर ही बछडे बिबट्याची नसल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. घटनास्थळी एकूण पाच बछडे आढळून आल्याने नेमके हे बछडे कोणत्या प्राण्याचे ? याबाबत शेतकरी व वनविभागाचे एकमत झालेले नाही. त्यामुळे आता या बछड्यांची जातकुळी बघण्यासाठी आता त्यांच्या मादीचा शोध घेण्याची वेळ वनविभागावर आली आहे. घटनास्थळी वनविभागाचे वनमजूर गोरक्षनाथ मोरे यांनी पाहणी केली. हे बछडे पाहिल्यानंतर घटनास्थळी आलेला वनकर्मचारी संभ्रमात पडला. त्याने या बछड्यांचा फोटो वरिष्ठांना पाठविला . मात्र, वरिष्ठांनी त्यावर काय‘ जावईशोध ’ लावला ? हे गुलदस्त्यातच राहीले. त्यामुळे वनविभागाच्या अज्ञानामुळे आता शेतकरी संभ्रमात पडले आहेत. वनविभागालाच या बछड्यांची ओळख पटली नसल्याने शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

यावेळी पोलीस पाटील पंकज आढाव, दादासाहेब पवार, संदीप पवार, संदीप मुंगसे, गणेश थेवरकर, रवी निशाने, विष्णु देठे, जगन्नाथ हापसे, अर्जुन देठे, रवींद्र पवार, गोरक्षनाथ देठे आदी शेतकरी उपस्थित होते. या परिसरात तातडीने वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
व्हिडिओ पहा: बछडे नेमके कोणत्या प्राण्यांचे? काय म्हणतात वनविभाग व शेतकरी... 

ऊस तोडणी चालु असताना मजुरांना हे बछडे आढळून आले आहेत. या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला देण्यात आल्यानंतर त्यांचे कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी हे बछडे बिबट्याचे नसल्याचे सांगितले. मात्र, हे बछडे बिबट्याचेच असल्याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आता येथील रानातील वस्तीवर बिबट्याचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याची मादी जेरबंद करावी. 
_ पांडुरंग देठे, शेतकरी माहेगाव-महाडूक सेंटर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या