मुळा डाव्या कालव्यातून आवर्तन सोडा, अन्यथा कालव्यात बसुन आंदोलन करणार

राहुरी तालुक्यातील पाणी वापर संस्था बरखास्तीची मागणी 

देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील २८ पाणी वापर संस्था बरखास्त कराव्यात. मुळा डाव्या कालव्याला तात्काळ आवर्तन सोडावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील शेतक-यांनी देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे विभागावर ठिय्या आंदोलन केले. तात्काळ या संस्था रद्द करव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहेे. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन शाखा अधिकारी जावेद सय्यद, सुधाकर सुरंगकर यांच्याकडे दिले.

राहुरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावून आंदोलनास गर्दी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे 10 ते 15 शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन छेडले. पोलिसांवर राजकीय दबाव आणुन आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आंदोलकांनी आरोप केला आहे. शनिवारी सकाळी देवळाली प्रवरा (ता.राहुरी) येथील पाटबंधारे उपविभागीय कार्यालयासमोर हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुळा डाव्या कालव्यावरील पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी हे शेतक-यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. त्यामुळे शेतीच्या आवर्तानास दिरंगाई झाली आहे. केवळ पाट पाण्यावरच अंवलबुन असणा-या शेतक-यांच्या शेती पिकाचे नुकसान होत आहे. तात्काळ डाव्या कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी ठिया आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

आंदोलकांच्या वतीने बोलताना संजय पोटे यांनी सांगितले की, पाणी वापर संस्था नफा कमविण्यासाठी स्थापन केलेल्या नसुन संस्था चालकांनी नफा कमवणे सोडले पाहिजे व कमीत कमी पैशात शेतकऱ्यांना शेतीला पाणी दिले पाहिजे. शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी मिळाले पाहिजे. पाणी वापर संस्था धंद्यासाठी नाही, तर सेवेसाठी स्थापन केल्या आहे. पाणी वापर संस्था शेतकरीच चालवत असताना सुद्धा शेतकऱ्यांचे हित पाहिले जात नाही हिच मोठी दुर्दैवाची बाब आहे. शेतीसाठी पाण्याचे नियोजन केले पाहिजे. पाणी देण्यास उशीर झाल्यास कालव्यात बसुन आंदोलन करू असा इशारा  पोटे यांनी दिला. रंब्बी हंगाम पुर्ण संपत आला तरी पाटाला पाणी नाही. त्यामुळे गहु, हरभरा पिकांच्या पेरण्या खोळंबल्या. विहरीचे पाणी आटले. धरणात पाणी असुन शेतीला पाणी नसल्याने शेती पडीक पडण्याची वेळ आली. शेतक-यांच्या मागणीनुसार शेतक-यांना पाणी मिळावे. पाणी वापर संस्थेच्या पदाधिकारी मोठा भ्रष्टाचार करत आहे. म्हणून शेतकरी संकटात सापडला आहे. रविवार सायंकाळ पर्यंत पाणी सोडले नाही तर  सोमवारी नगर मनमाड महामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी पोटे यांनी दिला आहे.

आंदोलनात पांडूरंग देठे, संजय पोटे, संपत थोरात, सोमनाथ थोरात, बांपुसाहेब आढाव, भाऊसाहेब कुलट, भरत गुंड, वैभव आढाव, ज्ञानेश्वर देठे, नानासाहेब दळवी, दत्ताञय जाधव, गोरख पवार, अदिनाथ देठे, विष्णू देठे, संदिप पवार, संदिप मुंगसे आदि शेतकरी सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या