राहुरी / प्रतिनिधी - शेतीक्षेत्रातील पारंपारिकतेला अधुनिकतेची जोड दिली तर त्यातून सकस, पोषक व आरोग्यदायी निर्मिती होते. जी आजच्या काळातल्या नवीन पिढीचे योग्य भरणपोषण करुन निरोगी दीर्घायुष्यासाठी निश्चितच मदत करणारी असेल यासाठी सतत आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी करणारी माता जर शेती व्यवसायात उतरली तर काय नवनिर्मिती करता येते याचं ज्वलंत उदाहरण पिंपळगाव फुणगी येथील प्रसिद्ध उद्योजक दिलिप जगताप यांच्या शेतीत सध्या पहावयास मिळत आहे.
व्हिडिओ पहा : खपली गव्हाविषयी काय म्हणतात सौ. जगतापसौ. वैजयंती दिलिप जगताप आदराने पंचक्रोशी त्यांना माई नावाने ओळखते नेहमीच उपक्रमशील व नवनवीन निर्माणासाठी प्रयत्नशील पती दिलिप जगताप सुरुवाती पासून उद्योगक्षेत्राकडे वळलेले असल्याने घरी असलेली शेती लग्न झाल्यापासून माईंच्याच गळ्यात पडलेली. सुरुवातीला पारंपरिक पिकांनाच त्यांनी प्राधान्य दिले होते. शेतीक्षेत्र मोठे असल्याने सर्व कामे घरचा व्याप सांभाळून मोलमजूरीने करवून घेणं हाच एककलमी कार्यक्रम परंतू त्यातून कालांतराने उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त येत होता. मग त्यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचा चंग बांधला. त्यात दरवर्षी शेतीमेहनती पिकापेक्षा फळबागेकडे लक्ष केंद्रित केले. चिक्कू, आंबा, नारळ, डाळींब पिकाबरोबर अगदी आता जांभूळ, आवळा आदी आयुर्वेदिक फळपिकांना प्राधान्य दिल्याचे प्रकर्षाने दिसते. मात्र ही फळपिके बहरताना त्यांना रासायनिक खते व किटक नाशकांचा वापर न करता गोठ्यातील जनावरांचे शेणखत व मलमूत्र यांचा कसोशीने व योग्य तंत्रज्ञान वापरून उपयोग करत निरोगी व सकस फळांचे उत्पादन त्या घेत आहेत. त्यांचे शेतीतील हे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी भेटी देतात तर महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीरार्थीही आवर्जून भेटी देतात. त्यांनी आपल्या शेतीवर केलेला कृषी पर्यटनाचा प्रयोग खूप यशस्वी झाला होता. कोरोनामुळे हे पर्यटन सध्या बंद आहे.
सद्यस्थितीत त्यांनी विविध आजारांवर जसे की मधुमेह, पोटविकार, महिलांचे आजार, ह्रदयविकार आदी विकारांवर गुणकारी असणाऱ्या खपली वाणाच्या गव्हाचे आपल्या साधारण ६ एकर क्षेत्रावर उत्पादन घेतले आहे. भात पिकासारख्या या वाणाला नेहमी ओलावा लागत असल्याने त्या स्वतः सतत या क्षेत्रात कार्यरत असतात तर हा गहू कोणतेही रासायनिक घटक न वापरता संपूर्णतः सेंद्रिय पध्दतीने कसा पिकवता येईल यासाठी त्यांचा कटाक्ष वाखाणण्यासारखा आहे. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतल्याचे एकंदरीत या क्षेत्राला फेरफटका मारला तर निश्चित जाणवते. मागील वर्षी त्यांनी आपल्या माहेराहून या गव्हाचे वाण आणून आपल्या शेतात पेरले होते. तेच बियाणे त्यांनी चालू हंगामात वापरले आहे. एकरी १० ते १२ किलो बियाणांचा वापर त्यांनी केला असून पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली असल्याचे त्यांनी सांगितले. या वाणाचे उत्पन्न कमी येते. मात्र सकस व पोषक आहाराचा समावेश यातून होत असल्याने मानवी शरीरावर होत असलेल्या रासायनिक घटकाच्या प्रादुर्भावाने विविध व्याधींंना नक्कीच दूर ठेवता येणार असल्याचे त्या खात्रीने सांगतात. बरोबरच सर्वच शेतकऱ्यांनी किमान चारदोन जनावरे दावणीला मुद्दामहून ठेवावीत जेणेकरून त्यांच्या मलमुत्रांचा योग्य वापर आपल्या शेतपिकावर करुन येणाऱ्या पिढीला सकस, दर्जेदार व पोषक अन्नघटक देवून सुदृढ पिढी घडविण्यासाठी मदत मिळणार आहे. यातून ग्रामीण जनतेची दवाखान्यातून होणारी शारीरिक व आर्थिक हानी टाळता येणार असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या