राहुरी - ऐन थंडीत वातावरणात बदल झाला असून नववर्षाच्या स्वागताला गडद धुक्याच्या दाट चादरीने हजेरी लावत जणू निसर्गाने 'तुम्ही बदललात म्हणून मी पण बदललोय' असे संकेतच मानव जातीला दिले असल्याचे चित्र शनिवारी सर्वत्र पहावयास मिळाले तर सर्वच रस्त्यांवर अघोषित संचारबंदीची परिस्थिती दिसली.
व्हिडिओ पहा :-गत चारदोन वर्षात एकूणच ऋतूमान बदलले असून उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात हिवाळा, तर हिवाळ्यात ऊन्हाळा जाणवत आहे. वातावरणात मानवाकडून सोडले जाणारे येनकेन प्रकारे प्रदूषणाचा फटका मानवाबरोबरच तमाम पशुपक्ष्यांना बसत आहे. नदीत सोडले जाणारे कारखान्यांचे प्रदुषित पाणी तर प्लास्टिक बंदी असूनही सर्रास वापरले जाणारे प्लास्टिक, वेगवेगळ्या कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर, वेळी अवेळी शेतातील ऊसाचे पाचरट अथवा तत्सम वस्तूंना जाळताना होत असलेला धूर, बरोबरच विकास कामांच्या आडून होत असलेली अमर्याद वृक्षतोड आदी मानव निर्मित कारणाने हवेतील प्रदुषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा फटका शहरी भागाला मोठ्या प्रमाणात बसला असून तेथे मानवाला श्वास घेणे सुध्दा अवघड होवून बसले आहे. त्याचे लोण आता ग्रामीण भागाकडे वळले असून मध्यंतरी सर्वत्र धूरसदृश्य परिस्थिती पहावयास मिळाली.
हवामान तज्ञांनी हा प्रदुषणाचा पट्टा असल्याचे मत व्यक्त केले होते. वातावरणाच्या या बदलाला प्रामुख्याने मानवच जबाबदार असून शहरी भागाबरोबर या प्रदुषणाने ग्रामीण भागही व्यापला असल्याने आगामी काळात मोठे नैसर्गिक बदल पहावयास मिळतील याची ही नांदी समजावी का असाही प्रश्न सध्या पर्यावरण प्रेमींना पडला आहे. त्याचाच भाग म्हणून हे वातावरणीय बदल सध्या पहावयास मिळत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रीपासूनच कमीअधिक प्रमाणात धुक्याने हजेरी लावली होती. शुक्रवारी सायंकाळ पासून ३१ डिसेंबर साजरी करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली होती. शासनाने कोरोना नियम कडक केले असतानाही हॉटेल, ढाब्यावर तरुणांबरोबर ज्येष्ठांचीही गर्दी दिसत होती. एरव्ही ओस पडलेली हॉटेल, ढाबे मात्र या दिवशी जत्रेसारखी ओसंडून वाहात होती. थंडीमुळे निपचित पडलेली दुचाकी नगर - मनमाड महामार्गावर भन्नाट पळत होत्या तर या वाहनांवरचा अर्वाच्य भाषेतला संवाद हलफुलक वातावरण ढवळून टाकत होता. दुसरीकडे वर्षभरात जितका धंदा झाला नसेल तो अवघ्या काही तासात कोंबडे, बोकड विक्री करणाऱ्या व्यावसायिकांबरोबरच हॉटेल व ढाब्यावाल्यांचा झाला तर हजारो लीटर दारु नववर्षाच्या स्वागतासाठी रिचवली गेली. म्हणूनच की काय रात्रीपासूनच धुक्याने हजेरी लावत सकाळी आपली उपस्थित गडद केली. पाच, दहा फुटावरचेही दिसेनासे झाल्याने नगर - मनमाड महामार्गावर वाहनांचे दिवे लागले गेले. परंतू दिवे लावूनही दिसत नसल्याने वाहन चालकांनी आहे तिथे थांबणे पसंत केल्याने या महामार्गावर अघोषित संचारबंदी लागली असल्याचे चित्र सकाळी साडेनऊ ते दहापर्यंत पहावयास मिळाले. एकूणच नववर्षाच्या स्वागताला निसर्गाचा अदभूत चमत्कार पाहिल्याचे समाधान प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर दिसत होते. हा नयनरम्य देखावा डोळ्यात साठवून व चित्रबध्द करण्यासाठी मोबाईल सरसावत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते.
0 टिप्पण्या