श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेले 'जीवनचिंतन'हे पुस्तक म्हणजे एक आपुलकीचा शब्दझरा असून या पुस्तकातील मुक्त शब्दचिंतन अंतर्मुख करीत जीवन भाष्य करणारे असल्याचे मत अहमदनगर आकाशवाणी केंद्र संचालक बाबासाहेब खराडे यांनी व्यक्त केले.
शिरसगाव येथील डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या 'जीवन चिंतन ' या चिंतनपर ललितगद्य पुस्तकाचे प्रकाशन आकाशवाणी केंद्रात केंद्र संचालक बाबासाहेब खराडे, उदघोषक सौ.वृषालीताई पोंदे, कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम, हंगामी उदघोषक संतोष मते यांच्या हस्ते झाले, त्याविषयी प्रतिक्रिया बाबासाहेब खराडे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'जीवनचिंतन' पुस्तक प्रकाशनची विनंती केली. संतोष मते यांनी नियोजन करून पुस्तक परिचय दिला.
बाबासाहेब खराडे आपला अभिप्राय व्यक्त करताना म्हणाले, डॉ. उपाध्ये यांचे वडिलांचं छत्र जन्मतःच हरपले, आईनेही साथ सोडली पण हे व्यक्तिमत्व हरले नाही. चिकाटी जपली, आयुष्याची लढाई लढली आणि जिंकली सुद्धा. साहित्य क्षेत्रात खूप मोठे काम करून ठेवले. आयुष्यात जे कुणी सोबत आले, साथ दिली त्यांच्याशी कृतज्ञ राहिले आणि राहत आहेत. त्यांनी चिंतन करून लिहिलेले 'जीवन चिंतन' नुकतेच प्रकाशित झाले. त्यांचा जीवनप्रवास खूप काट्याकुट्याचा आहे, पण त्या काट्यांना फुले समजत ते पुढे जात राहिले आणि आज एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला.
आकाशवाणीसाठी त्यांनी भरपूर लेखन केले, त्यांच्याकडे ती प्रतिभा होती म्हणून आम्ही त्यांच्या लिखाणाचा योग्य वापर करून घेतला. आकाशवाणीला अपेक्षित असे लेखन त्यांनी केले. सुचवलेले बदल आत्मसात करून पुनर्लेखन केले. चिंतन, कथा, कविता, मुलाखत असं भरपूर लेखन त्यांनी आकाशवाणीसाठी केले. विशेष म्हणजे हे पुस्तक त्यांनी आकाशवाणीतल्या काही व्यक्तींना अर्पण केले, त्यामध्ये माजी केंद्र प्रमुख लियाकत अली सय्य्द, माजी केंद्र प्रमुख अरुणजी सोळंकी, केंद्रप्रमुख बाबासाहेब खराडे, उदघोषक वृषालीताई पोंदे, उदघोषक दीपालीताई जोशी, हंगामी उदघोषक संतोष मते आणि अर्थातच आकाशवाणीला समर्पित केले. हा त्यांच्या मनाचा खूप मोठेपणा आहे.
'जीवनचिंतन' या ललितलेख संग्रहामध्ये डॉ. उपाध्ये सरांनी व्यक्ती विशेष, दिनविशेष तसेच विविध विषयांवर सुंदर चिंतन केलं आहे. त्यांची भाषा साधी, सोपी तर कधी लालित्यपूर्ण आहे. विषयांचा आवाका मोठा असला तरी तो फार कमी शब्दांत मांडणे फार अवघड असते. सरांना ही लेखनकला खूप छान जमली आहे. सरांचे इतर लेखन विविधांगी, विपुल आहे. सरांशी जेव्हा जेव्हा बोलण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा त्यांच्या अंतःकरणात एक आपुलकीचा खळाळता झरा असल्याचे जाणवले . पुढील लेखनासाठी सरांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो, अशा भावना श्री खराडे यांनी व्यक्त केल्या. पुस्तक प्रकाशन केल्याबद्दल डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सर्वांचे आभार मानले.
0 टिप्पण्या