आपल्याकडे एक नेहमी मोठा यक्ष प्रश्न विचारला जातो तो म्हणजे भारत खंडात नोबेल पारितोषिके का मिळत नाहीत? किंवा जी मिळाली आहेत ती एवढी कमी का? याला अनेक कारणे असतील त्यातले मूळ कारण कदाचित अंकल मेकॉलेने (मेकॉले चाचा) आपल्याकडे आणलेली कारकुनी तयार करण्यासाठीची इंग्रजाळलेली शिक्षणपद्धती. परंतु यावरही मात करण्यासाठी अनेक उपाय आहेत म्हणूनच आज आपण ज्या कटटयाबद्दल बोलत आहोत तो आहे संशोधन कट्टा किंवा शोधक कट्टा काहीतरी सृजनशील करणाऱ्यांचा कट्टा नवनिर्मितीचा आनंद घेणारयांचा कट्टा.
कदाचित आपल्याकडे लहानपणापासून शोधक वृत्ती किंवा संशोधन वृत्ती निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो! संशोधनाधिष्ठित शिक्षणपद्धतीचा अवलंब फार पूर्वी आपण करायला पाहिजे होता. परंतु तो न झाल्यामुळे कदाचित आपण संशोधनात मागे आहोत की काय अशी शंका येते. (नवीन शैक्षणिक धोरणात याचा चांगलाच ऊहापोह केलेला आहे अर्थात आपण अंमलबजावणी कशी करतो त्यावर हे सर्व अवलंबून राहील.) वास्तविक आपण मागे नसतो परंतु हे संशोधन आहे हे कळण्यासाठी जे ज्ञान लागते ते तर तोकडे नसते ना? त्यात मात्र आपण नक्की कमी पडतो.
आपण सगळेच शोधक असतो. संशोधन करणारी मुले /विद्यार्थी ही कायम चौकस, अतिशय शोधक, अष्टावधानी, प्रचंड वाचन करणारी असतात. वास्तविक आपण जन्मापासूनच शोधक वृत्तीचे असतो. नवीन काहीतरी मिळवण्यासाठी धडपड करतो. परंतु नंतर कधी तरी आपल्या मार्क्सच्या मागे लागल्याने वा परीक्षा पद्धतीने पुस्तकी किडे होऊन जातो, हे आपल्यालाच कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा चिकित्सक पद्धतीने वापर करणे जमले पाहिजे. आपल्याला वर्गात जी माहिती मिळते ती झाली केवळ माहिती पण या माहितीचा जगण्यासाठी उपयोग करणे, जीवन जगण्यासाठी जीवनशैली मध्ये थोडक्यात डे टु डे लाईफ मध्ये उपयोग करणे म्हणजे खरं तर ज्ञान होय म्हणजेच नॉलेज. ज्ञान निर्मिती करणं म्हणजे क्रिएशन ऑफ नॉलेज इज रिसर्च म्हणजे संशोधन.
संशोधन; बऱ्याच वेळा असं वाटतं की खूप मोठ्या मोठ्या प्रयोगशाळा असाव्यात मोठ्या मोठ्या लॅबोरेटरीज असाव्यात, सगळं हाय फाय असावं अगदी dust less lab असावी. संशोधन करण्यासाठी खूप पैसा खूप मोठी मोठी इन्स्ट्रुमेंट्स असावी लागतात, असेही नाही फक्त चौकस, निरीक्षक बुद्धी, पूर्वज्ञान त्याचा योग्य तो योग्य त्या ठिकाणी केलेला वापर आणि अर्थातच या सगळ्या ज्ञानाचा समाजासाठी होणारा उपयोग किती होतो हे पाहता आले पाहिजे.
स्वयंपाक घरात एखाद्या गृहिणीने नवीन एखादी रेसिपी अर्थात पदार्थ तयार केला तर ती संशोधन पद्धती झाली म्हणजे मेथीची भाजी कशी करायची? हे पहिल्यांदा ज्या महिलेने किंवा ज्यांनी कोणी तयार केले असेल ती खरी शास्त्रज्ञ. आपल्याकडे असे म्हटले जाते की शेती करणाऱ्या सुरुवातीच्या काळात महिलाच होत्या. कारण त्यांना पहिल्यांदा कळलं ते बीज मातीमध्ये टाकल्यानंतर ते अंकुरून पुन्हा त्याची त्याचं धान्य तयार करता येतात. बैलगाडीची चाके वा चाकाचा शोध क्रांतिकारी मानला जातो. आता झपाट्याने जग बदलते आहे. सुरुवातीच्या काळात लागलेले शोध आणि नंतरच्या काळात लागलेले शोध आणि आत्ताच्या मध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.
मुळात प्रश्न पडले पाहिजेत ! प्रश्न विचारले पाहिजेत! प्रश्नांची उकल करता आली पाहिजे! प्रश्न सोडवता आले पाहिजेत! नाही तर किमान त्या दिशेने पावले तरी उचलली पाहिजेत! प्रश्न पडल्यानंतर ते तिथल्या तिथे विरून जाणं हे संशोधनाला अत्यंत मारक असतं. खरं शिकणं जे होतं ते आपापसातल्या चर्चांमधून. ज्याला पियर लर्निंग समजले जाते. आपला एखादा पाच सहा जणांचा चमू तयार करावा. त्यामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान करावं. देवघेव करावी. खूप मुलं हे करत असतात, छोट्या छोट्या गोष्टींमधून संशोधन होत असते. अनंत प्रश्न पडले पाहिजेत! जे नॉलेज मला मिळालेलले आहे त्याचा उपयोग कसा करायचा? याकडे जर भर दिला तर संशोधन वृत्ती नक्कीच प्रवृत्ती मध्ये बदलेल. शिकवण्यापेक्षा शिकण्यावर भर दिला तर आपण आपसूकच संशोधनाकडे जाऊ. अर्थात यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घेता आले पाहिजेत. विशेषत: शेती, शेतीतले अनंत प्रश्न म्हणजे डाळिंबाच्या शेतावर पडलेला तेल्या, करप्या, कुजव्या, रोग यावर एकत्र येऊन अभ्यास करून निर्मूलन करता आले तर. जे प्रश्न सरळ सरळ आपल्या शी निगडीत आहेत पेस्टिसाइड किंवा पेस्तीसाईड चा बेसुमार वापर. त्यामुळे वाढलेले आरोग्याचे अनंत प्रश्न. पाणी, हवा, माती यामध्ये झालेले अतोनात असे प्रदूषण. अनंत प्रश्न निर्माण झाले आहेत. नैसर्गिक शेतीची एकीकडे भाषा आणि दुसरीकडे या सगळ्याचा बेसुमार वापर हे गणित सोडवता आलं पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये सेमीकंडक्टर तुटवड्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या योजना आखल्या आहेत. त्यात आपल्याला सामावून जाता येईल का ?
बर्याचदा असं होतं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग आपण संशोधन वृत्ती कडे जातो परंतु अगदी शालेय पातळीपासून संशोधनाकडे अत्यंत सकारात्मक तेने वळले पाहिजे. संशोधन ही केवळ विज्ञान शाखेची मक्तेदारी नाही. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, कला शाखा त्यातील अनेक घटक. या सगळ्यांमध्ये संशोधन करता येतेच. ती सगळी शास्त्रच आहेत पण ती आपल्याला समजून घेतली पाहिजेत. त्यासाठी परदेशी आणि अर्थातच भारतीय संशोधकांचे निबंध, पुस्तक, ग्रंथ मोठ्या प्रमाणात वाचले पाहिजे. त्याचे चिंतन झाले पाहिजे मनन झाले पाहिजे त्यावर लिखाण झाले पाहिजे तर मग आपण संशोधनाकडे वळू.
खूप मुले नानाविध प्रयोग करत असतात कधी अभ्यासाच्या पद्धती मध्ये, कधी नवीन काही शोधण्यामध्ये, नवनिर्मिती करतात, आनंद घेतात, शेतीमध्ये, स्वयंपाकात, कलाकारी मध्ये अर्थात महाविद्यालयांमधून ही संख्या थोडीशी कमी असते यातूनच पुढे शास्त्रज्ञ तयार होतात प्रोजेक्ट, कॉम्पिटिशन, प्रदर्शन, आविष्कार सारख्या मा. राज्यपाल आयोजित स्पर्धा किंवा राष्ट्रीय स्तरावर आणि अन्वेषण सारख्या राष्ट्रीय स्पर्धा या स्पर्धांमधून ही मुलं हिरिरीने भाग घेत असतात. पुढे पुढे जात असतात अगदी परदेशात सुद्धा या विद्यार्थ्यांना जाता येतं.
आपल्याकडे जुगाड पद्धतीला कधीकधी हिणकस दृष्टीने बघितले जाते. परंतु जुगाड हा संशोधनाचा एक आविष्कारच असतो. थ्री इडीयट्स मधले अनंत प्रयोग किंवा दांडगी पोर नावाच्या चित्रपटातले प्रयोग या धर्तीवर आपल्याला लक्षात घेता येतील कधीकधी आपण केलेले प्रयोगाचं आपल्याला कौतुक वाटत नाही याचं कारण आपल्याकडे दस्तऐवजीकरण करण्याची अर्थात डॉक्युमेंटेशन करण्याची कसब फारच कमी आहे. मुळात प्रत्येक गोष्टी मध्ये लिहून ठेवण्याच्या, डायरी लिहिण्याच्या कल्पना आपल्याकडे राबविल्या गेल्या पाहिजेत.
जसं आज परसामध्ये लाल मुंग्या निघाल्या. पाली इकडून तिकडे पळाल्या. कावळ्यांनी काड्या जमवून घरटे करायला सुरुवात केली. अचानक काळ्या मुंग्या पांढरे दाणे घेऊन इकडून तिकडे जायला लागल्या. या दिवशी पाऊस पडला. आणि या सगळ्याचं कोरिलेशन करणे जसे कावळ्याने घरटे कुठे बांधले? कधी बांधले? आणि इतक्या दिवसानंतर पाऊस पडला असा तार्किक अभ्यास करता येईल अर्थात मुळाशी जाऊन. अनंत प्रश्न आपल्याला पडायला हवेत. ही केवळ सोदाहरण म्हणून दिलेले आहे...असे अनंत विषय आपल्याला घेता येतील अर्थात केवळ अप्लाईड संशोधनच महत्त्वाचे नाही बेसिक सुद्धा महत्त्वाची जिथे जिथे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध आहे तिथे तिथे त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर चा वापर करून संशोधन करावे. परंतु निसर्ग, नदीचे स्रोत, डॅम, धरण अशा अनंत गोष्टी आपल्याला संशोधनाचे ओपन हब म्हणून वापरता आले पाहिजेत.
संशोधन करणाऱ्यांना प्रोत्साहन देऊ यात !जे लोक संशोधन करत आहेत त्यांना वेळ देऊयात! जमेल तसे प्रत्येकाने संशोधन करूयात. संशोधक होऊयात. कॉलेजमधल्या कुठल्या ना कुठल्या जमलं तर सगळ्याच कट्ट्याशी नाळ जुळवता आली तर ?
धन्यवाद
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या