महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार यावर राज्यमंत्री तनपुरेंचे मोठे वक्तव्य

राहूरी विद्यापीठ प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पायउतार होईल. अशा वल्गना केल्या जातात. परंतू, उर्वरित साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून, पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी सरकार सत्तेवर राहील, असे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ठणकावून सांगितले. जोगेश्वरी आखाडा येथे वृक्षारोपण, स्मशानभूमीतील विकास कामे, अंतर्गत रस्ते, सौरऊर्जेचा हायमॅक्स दिवा लोकार्पण प्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी काशिनाथ गाढे होते. नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, विलास तनपुरे, नानासाहेब भुजाडी, ज्ञानदेव हारदे, भाऊसाहेब गुंजाळ, मारुती हारदे, किशोर जाधव, शिवाजी ङौले उपस्थित होते.
     मंत्री तनपुरे म्हणाले, "राहुरी पालिका हद्दीत वीस कोटी खर्चाची सुधारित पाणी योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. या कामाच्या मंजुरीचा मागील लोकप्रतिनिधींनी भुलभुलैय्या केला. जनतेची फसवणूक केली. आमदार झाल्यावर पाठपुरावा करून, योजना मार्गी लावली. राहुरी शहराच्या वैभवात भर घालणारा जॉगिंग ट्रॅकचे सुशोभिकरण करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होईल. राहुरी नगरपालिका हद्दीतील सर्व रोहित्र अतिरिक्त भारमुक्त केले आहेत. पालिका हद्दीत जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट प्रस्तावित केले आहे. राहुरीचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध आहे." असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या