राहुरी : कांदा बियाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.यामुळे सदर बियाणे कंपनीवर कारवाई करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी,या मागणीचे ईनिवेदन क्रांतीसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पाठविण्यात आल्याची माहिती राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा येथील शेतकर्यांनी कांदा लागवड केली होती. सदर कांदा लागवडीकरिता भुमीपुत्र सीड्स या कंपनीचे लाईट लाल कांदा बियाणे खरेदी केले होते. सदर कंपनीच्या लागवड केलेल्या कांद्याची शेतात पाहणी केली असता सदर कांदा हा लाल नसून शुभ्र पांढरा कांदा असल्याचे निदर्शनास आले. यावेळी परिसरातील शेतकर्यांनी खातरजमा केली असताना हा कांदा लाल नसून शुभ्र पांढरा असल्याची खात्री पटली. तद्नंतर या शेतकऱ्यांनी कांदा बी खरेदी केलेल्या केंद्राशी संपर्क साधून सदरील माहिती दिली. त्यांनी या शेतकऱ्यांना कंपनीच्या अधिकार्याचा संपर्क क्रमांक देऊन त्यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.शेतकर्यांनी दिलेल्या नंबरवर बर्याच वेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यांचा फोन उचलण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली,यामुळे संपर्क होऊ शकला नसल्या कारणाने शेतकऱ्यांनी क्रांती सेनेच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधत फसवणूक झाल्याची माहिती पुराव्यानिशी दिली.भुमीपुत्र सीड्स या कंपनीकडून कांदा बियाणे विक्री मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. या कारणास्तव शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कंपनीवर फसवणूक केल्याप्रकरणी योग्य ती कारवाई करत या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा व सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या