राहुरी : महावितरण कंपनीने रोहित्र बंद करून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने डी.पी. बंद करुन शेतीपंपाचे विजबिल वसुलीसाठी पठाणी पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालू केला आहे.अतिवृष्टी, गारपीट व कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीज बिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे. "शेती पंपाचे वीजबिल भरा नाहीतर रोहित्र बंद "अशी सक्ती लावली आहे.शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता, त्यांची परिस्थिती न पहाता रोहित्र बंद करून वीज पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे.शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करुन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे,शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ म्हसे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे, युवक उपाध्यक्ष शेखर पवार,राजेंद्र पेरणे,अर्जुन म्हसे,विजय म्हसे,मंजाबापू म्हसे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या