बिडकीन बसस्थानकात महिलांसाठी प्रसाधनगृह बांधा.


निवेदन देताना अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे, गणेश औटे आदी

ढोरकीन : पैठण तालुक्यातील बिडकीन हे तालुका दर्जाचे गाव असून येथील बसस्थानकातून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात परंतु सदर बसस्थानकात शौचालयाची व्यवस्था नसल्याने येथे थांबणाऱ्या विद्यार्थ्यींनी, महीलांसह इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. गैरसोय दूर करण्यासाठी सदर बसस्थानकात त्वरीत प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाच्या वतीने मंगळवारी (दि.१७) पैठण आगारप्रमुख गजानन मडके यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.

     औरंगाबाद पैठण मुख्य रस्त्यावरील बिडकीन हे तालुका दर्जाचे गाव असून या ठिकाणाहून रोज हजारो महिला, विद्यार्थीनी, शिक्षिका तसेच इतर प्रवासी बिडकीन बस स्थानकावर थांबतात. परंतु या‌ बसस्थानकात सुलभ शौचालय नसल्यामुळे महिलां व विद्यार्थीनींना अडचणीस सामोरे जावे लागत आहे. तसेच मोकाट जनावरे व कचरा, दुर्गंधीचा सामना येथे थांबणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे. शासनाने मोठा गाजावाजा करत स्वच्छता अभियान राबवले,मात्र बिडकीन बस स्थानकात कोणतीही सुविधा व स्वच्छता नाही.त्यावरून शासनाच्या धोरणाचा बिडकीन बसस्थानकात फज्जा उडाला असल्याचे दिसून येते. आगार प्रमुखांनी महिलांची, विद्यार्थीनीची व नागरीकांची होत असलेली गैरसोय तात्काळ थांबवून नवीन प्रसाधनगृहाची व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेना पक्षाच्या वतीने निवेदनातून करण्यात आली.अन्यथा क्रांतीसेना पक्षाच्या वतीने पैठण आगारप्रमुखांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

    यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे, गणेश औटे, नितीन देशमुख, बाबा घटे, गणेश गरड, निखील गांधले आदीं पदाधिकारी, कार्येकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या