नगर : जिल्हा रुग्णालयाच्या जागेवर आयुष रुग्णालय होणार आहे. मात्र, एका शाळेला मैदान मिळावे, यासाठी आराखडा बदलण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. शाळेला जागा देण्यासाठी प्रशासन असा फेरबदल करीत असेल, तर आम्हालाही तेथे कार्यालयासाठी जागा द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख मधुकर म्हसे यांनी केली आहे.
याबाबत गृह शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना क्रांतिसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत साबळे, बापूसाहेब विधाटे, एम. एस. बर्वे आदींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. "आयुष'च्या भूमिपूजनाच्या दिवशीच एका शाळेने आंदोलन केल्याने तो कार्यक्रम रद्द करावा लागला.शाळेला जागा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाकडून पहिला आराखडा बदलून दुसरा तयार करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालयाची दोन निवासस्थाने पाडली जाणार आहेत. सुमारे सात कोटी रुपयांची जागा फक्त "त्या' शाळेसाठी मोकळी सोडली जाणार आहे. क्रांतिसेनेतर्फे सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम लढा देण्यात येतो. आम्हालाही नगरमध्ये कार्यालयासाठी जागेची गरज आहे.
शाळेसाठी जर सरकारी जागा सोडली जात असेल, तर आम्हालाही जिल्हा रुग्णालयाने कार्यालयासाठी तेथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने "आयुष'च्या आराखड्यात फेरफार केला, तर आम्हालाही तेथे जागा द्यावी लागेल, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा क्रांतिसेनेने दिला आहे.
0 टिप्पण्या