परतीचा पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान
विलास लाटे, ढोरकीन
पैठण तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने लावून धरल्याने परीपक्व होवून काढणीला आलेल्या सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून सोयाबीन, मका, बाजरी, कापसातून अंकुर फुटले आहे. पोटच्या मुलाप्रमाणे लहानाची मोठी केलेले पिके परतीच्या पावसाने उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई व कापसाला आठ हजार प्रतिक्विंटल हमी भाव द्यावा अशी मागणी अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पावसासाठी आसुसलेला शेतकरी आज पावसाला थांब म्हणतोय...पण पाऊस काही थांबेना. जेव्हा पाऊस हवा होता तेव्हा तो पडला नाही. इकडुन तिकडून पडला त्यावर कशीबशी पिके बहरली होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. शेतकऱ्यांना कधी पाऊस नसल्यामुळे तर कधी पावसामुळे सतत नुकसानीचा सामना हा पाचवीला पुजलेलाच. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांची जशी थट्टाच मांडली आहे. त्याच्या या थट्टेने शेतकरी धुळीस मिळत आहे. तरीही हार न मानता दरवर्षी हे वर्ष तरी चांगलं साधेल अशी भोळी भाबडी आशा मनाशी बाळगून पुन्हा उसनवारी, कर्ज काढून काळ्या आईची ओटी भरुन शेतामध्ये राबराब राबतो. काबाडकष्ट करून जवळ आहे ते सर्व पणाला लावून दरवर्षी मातीत टाकून जुगार खेळतो. परंतु पदरात पडत काहीच नाही. पडते ती फक्त निराशा. या अशा निराशेतुन हतबल होऊन अनेकांनी आपले जीवन संपवले. तर अनेकजण संपविण्याच्या मार्गावर आहेत. परंतु यावर पाहीजेत त्या प्रभावी उपाययोजना शासन स्तरावर होताना दिसत नाही. मिळतात फक्त आश्र्वासने. 'जगाचा पोशिंदा', 'भारत हा कृषीप्रधान देश आहे', असेही भाषणात गर्वाने सांगितले जाते. परंतु हाच जगाचा पोशिंदा आज तिळतिळ मरतोय. ते कुणालाच का दिसत नाही. सतत कधी पावसाअभावी, कधी अतिवृष्टीमुळे जुगार हारलेला शेतकरी यदाकदाचित दोन्ही व्यवस्थित राहीलं तर मालाला आधारभूत किंमत नसल्यामुळे मारला जातो हे नित्याचेच झाले आहे. स्वत: पिकविलेला माल गरजेपोटी दुसऱ्याने ठरवलेल्या कवडीमोल भावाने विकता विकता नकळत स्वत: कधी विकला जातो हे त्याचे त्यालाच कधी कळत नाही. सध्या तालुक्यात धो-धो बरसत असलेल्या परतीच्या पावसाला बघून, पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावून सांभाळलेली बाजरी, मकाच्या कणसातून व कपाशीच्या बोंडातून अंकुर फुटले आहे. डोळ्यांदेखत तोंडाशी आलेले पिक उध्वस्त होत असल्याचे बघून शेतकरी हवालदिल झाला आहे. खायची वेळ आली नी तोंडचा खास हिरावला गेला अशी अवस्था झाली आहे. शासनाने नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व कापसाला प्रतिक्विंटल आठ हजार रुपये भाव द्यावा अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर गोरे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण शेलार, गणेश औटे, संदीप तांबे, ज्ञानेश्वर गवांदे आदींनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. नसता क्रांतिसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या