मानेगाव / प्रतिनिधी : माढा तालुक्यातील केवड व उंदरगांव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी एकीकडे चारा, वैरण, सुग्रास व पेंडीचे वाढते दर आणि दुसरीकडे दुधाचे सातत्याने कमी होणारे दर यामुळे शासनाच्या व खाजगी दूध संस्थांच्या चुकीच्या धोरणाचा तीव्र निषेध म्हणून २५० ते ३०० लीटर दूध दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी रस्त्यावर आणि सीना नदीत ओतले आणि शासनाने त्वरित यावर दरवाढीचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. .
सध्या ग्रामीण भागात फक्त १५ रूपये प्रति लिटर इतक्या कमी दराने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध खरेदी केले जात आहे. त्यामुळे संतप्त दूध उत्पादकांनी दूध रस्त्यावर ओतून तीव्र संताप व्यक्त करीत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. मध्यंतरी शेतकरी संप व आंदोलन केल्यामुळे शासनाने दूध दरात वाढ केली होती पण प्रत्यक्षात ही वाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात पडलीच नाही. शासनाकडून फरकाचे अनुदान मिळाल्यावर दरवाढ मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती परंतु दिवसेंदिवस दूध खरेदीदारांकडून दर कमी कमी होत गेले. अगोदरच यावर्षी भयंकर दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी अक्षरश: वैतागून गेला असून तो खूपच आर्थिक अडचणीत सापडला आहे. .
माढा तालुक्यात बहुतांशी ठिकाणी खासगी डेअरी मालकांकडून दूध खरेदी केले जाते. सध्या पंधरा ते वीस रूपयाचे दरम्यान दूधाला दर दिला जाणार ही बाब लक्षात आल्याने संतप्त झालेल्या दूध उत्पादकांनी आपले दूध डेअरीला घालण्यापेक्षा सीना नदीत व मुख्य रस्त्यावर ओतून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध केला..
याप्रसंगी माजी सरपंच सुनिल धर्मे, क्रांती सेना संघटनेचे युवक अध्यक्ष गणेश चव्हाण, पोलीस पाटील सज्जन पाटील, प्रशांत पाटील, बालाजी पाटील, प्रमोद मिरगणे, वैभव पाटील, दादा कोळेकर, भाऊसाहेब पाटील, नाना लटके, अमोल उमाटे, भैरवनाथ घोडके, हसन शेख, पप्पू लटके, राहुल धर्मे, अमोल मिरगणे, विजय लटके, भैरवनाथ पाटील, आप्पासाहेब लटके, कृष्णा पासले, बाळासाहेब लटके, प्रमोद लटके, सचिन धर्मे, उमेश गायकवाड यांच्यासह शेतकरी व दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या