स्व. अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा पहिला लढा लढला. मंत्रालयावर मोर्चा काढून अण्णासाहेब पाटील यांनी आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व केले. त्यासाठी बलिदानही दिले. गेले कित्येक वर्षे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आला की अण्णासाहेब पाटील यांचे नाव घेतले जायचे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर अण्णासाहेब पाटील यांच्या बलिदानाची आठवण झाली.
कोरेगाव तालुक्याच्या आमदार राहिलेल्या व महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून काम केलेल्या शालिनीताई पाटील यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढाई लढली. आरक्षणाच्या मुद्यावरुन शालिनीताईंचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी वितुष्ट आले. त्यांना राष्ट्रवादी सोडावी लागली. त्यांनी मराठा समाज समोर ठेवून क्रांतीसेनेची स्थापना केली. राज्यभर मराठा आरक्षणाचा जागर केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दुर्देवाने कोरेगाव मतदार संघात त्यांचा पराभव झाला आणि खिन्न मनाने त्या मुंबईला गेल्या. मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर कोरेगाव मतदार संघासह संपूर्ण महाराष्ट्रात शालिनीताईंच्या योगदानाची आठवण काढली जावू लागली आहे. पुन्हा एकदा शालिनीताईंनी कोरेगाव मतदार संघात सक्रीय व्हावे, अशी मागणीही जोर धरु लागली आहे.
अण्णासाहेब जावळे-पाटील यांनीही छावा संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रचार व प्रसार केला. संघटना बांधली, गुन्हे दाखल करुन घेतले. त्यामुळे अण्णासाहेबांचीही आठवण काढली जात आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाल्यानंतर आत्तापर्यंत अनेक तरुणांनी बलिदान दिले. कोपर्डीच्या भगिनीवर झालेल्या अत्याचारानंतर मराठा क्रांती मोर्चाने उठाव केला. कोपर्डीची भगिनी व बलिदान देणार्या सर्व हुतात्म्यांची या निमित्ताने मराठा समाजाला आठवण होवू लागली आहे. मराठा समाजासाठी योगदान देणार्या सर्व संघटना, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञ, संपादक, पत्रकार, सर्वच क्षेत्रातील मराठा समाजातील मंडळींविषयी मराठा समाज उदारअंतकरणाने बोलू लागला आहे. आरक्षण हे अनेकांच्या त्यागातून, कष्टातून मिळाले असल्यानेच जल्लोषाऐवजी मराठा समाज अभिवादनासाठी रस्त्यावर उतरत आहे.
0 टिप्पण्या