सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळाले याचा आनंद आहे. मात्र, आरक्षणाचा लढा सुरु केल्यापासून मी आर्थिक निकषावर सर्व जातीधर्मातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण द्यावे या भूमिकेवर आजही ठाम असल्याचे भूमिका डॉ. शालिनीताई यांनी मांडतानाच राज्य घटना ही एका व्यक्तीने लिहिलेली नाही तर या घटना समितीत इतर 50 ते 60 नेत्यांचा समावेश होता आणि या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाकारत नाही पण घटना समितीतील इतर मान्यवरांचेही योगदान नाकारु नका, या त्यांनी मांडलेल्या भूमिकेचाही पुर्नच्चार शुक्रवारी केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल आरक्षणाची भूमिका जाहीरपणे मांडल्याने राजकीय वनवास भोगावा लागलेल्या डॉ. शालिनीताई पाटील यांचा दि. 22 रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते कोरेगावात होणाऱया कार्यक्रमात जाहीर सत्कार होणार आहे. यानिमित्ताने बऱयाच वर्षांनी त्या साताऱयात आल्या त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

खूप दिवसांनी साताऱयातील मिडियाशी संपर्क साधताना डॉ. पाटील भावूक झाल्या होत्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते पतंगराव कदम, पाडळीचे पोलीस पाटील संभाजी फाळके, शिक्षक चंद्रकांत काळे यांच्या आठवणी जागवताना अश्रुंना वाट मोकळी करुन दिली. तालुका पातळीपासून देशपातळीपर्यंतच्या विविध विषयावर त्यांनी मते व्यक्त केली. मध्यंतरी जरा पडल्यामुळे दुखापत झाली होती. आता सावरली आहे. वयानुसार तशी मी ठणठणीत असून माझ्या उर्वरित जबाबदाऱया पार पाडण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱयाची कामे का होत नाहीत. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढा द्यावाच लागेल. ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते भ्रष्टाचारात खोलवर रुतले आहेत. राज्य सहकारी बँक तोटय़ात गेली, राज्यातील दुष्काळ हटलेला नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे, शेतीमालाला हमीभाव नाही या राज्यातील प्रश्नावर भाष्य करतानाच डॉ. पाटील यांनी पंतप्रधान मोदी प्रत्येकाच्या खात्यात देणार असलेल्या 15 लाख रुपयांची मी वाट पहात असल्याची खोचक टीकाही केली. राम मंदिराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा हे राममंदिर होणार तरी कधी हा माझा सवाल असल्याचे त्या म्हणाल्या.

ज्या देशात पूर्वी सोन्याचा धूर निघत होता त्याच देशातील आजमितीची परिस्थिती फार विदारक झाली आहे. चांगल्याला चांगले म्हटले पाहिजे, सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे या भावना का लोप पावत चालल्या आहेत याचाही विचार समाजाने केला पाहिजे. भरतीसाठी जागा 60 आणि 12 हजार युवकांचे अर्ज येतात भरती झाल्यानंतर 60 जणांना नोकरी मिळते उरलेल्या 11 हजार बेरोजगारांचे प्रश्न कोण सोडवणार आहे. साताऱयातील फाशीच्या वडाची झालेली दूरवस्था अवस्थ करते. त्या क्रांतीकारकांच्या, देशाच्या सैनिकांच्या बलिदानाला विसरणारा समाज कशी प्रगती करणार असाही सवाल डॉ. पाटील यांनी केला व सामजिक वातावरण निकोप करण्यासाठी समाजाने प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली. पत्रकार परिषदेला शाहूराज फाळके तसेच डॉ. पाटील यांना मानणाऱया  कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

मला विश्वास वाटला तर मी सक्रीय होईन

आज खूप वर्षांनी मी आले. सकाळपासून कोरेगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी माझी भेट घेतली. माझी विचारपूस केली. ताई तुम्ही परत यावे अशी त्यांची भावनाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, ज्या कोरेगावकरांनी मटणावर ताव मारुन माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला राजकीय वनवासात पाठवले त्यांच्यावर आता मला विश्वास वाटला तर मी कोरेगावात सक्रीय होईन. आता मतदारसंघाचे स्वरुपही बदललेले आहे आणि मीही थकले आहे. जरी मी नसले तरी माझ्या कुटुंबातील कोणी किंवा माझा कार्यकर्ता मी सक्रीय करेन, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.


जरंडेश्वरच्या लढाईला उदयनराजेंचे पाठबळ

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची कायदेशीर लढाई सुरुच आहे. मला आमदार म्हणून मिळणाऱया निवृत्तीवेतनातून खर्च करुन न्यायालयात लढत आहे. ज्यांच्या माध्यमातून गुरु कमोडिटी कंपनीने जंडरेश्वरचा लिलाव घेतला त्या कंपनीची पात्रताही नव्हती. कंपनीच्या खात्यावर फक्त 68 लाख रुपये होते ही माहिती मिळाली आहे. मात्र, त्यांनी कोटय़वधी रुपयांना कारखाना घेतला कसा? त्या विरोधात मी लढत असून माझ्या या लढाईला खासदार उदयनराजे भोसले यांचे पाठबळ असल्याने शेवटपर्यंत मी लढणार आहे.

  त्या निवडणुकीला जिंकला पैसा, मटणाचा पाऊस

मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडताना मी त्यावेळी जाहीरपणे आर्थिक निकषावर आरक्षणाचे समर्थन केले होते. त्यावेळी आज जे आरक्षणाचा आनंद व्यक्त करत असलेले शरद पवार यांनीच मला पक्षातून काढून टाकले. निवडणुकीत  अंतिम क्षणापर्यंत माझा विजय निश्चित होता. शरद पवारांच्या सभेला माणसे गोळा करावी लागली. त्यांना माझ्या ताकदीचा अंदाज आल्याने शेवटी त्यावेळी कोरेगाव मतदार संघात पैसा आणि मटणाचा पाऊस पडला व तो जिंकला, अशी टीका डॉ. पाटील यांनी करतानाच आता तालुका विकासापासून वंचित आहे तसे ते मटण तरी खरे होते का? अशी कोपरखळीही त्यांनी मारली.