मर्यादित इंधनात सर्वात जास्त वेळ हवेत उडण्याचा विक्रम सुद्धा आप्पासाहेब ढुस यांच्या नावे..!
(नवी दिल्ली)
जागतिक पॅरामोटर स्पर्धेत हवेतून 34 की.मी. अंतर पार करणारे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढुस हे नुकतेच प्रथम भारतीय ठरले असताना आता मर्यादित इंधनात सर्वात जास्त वेळ हवेत तरंगण्याचा विक्रम सुद्धा आप्पासाहेब ढुस यांच्या नावे नोंदविला गेल्याने ढुस हे हवेतील साहसी क्रीडा प्रकारात पाचव्या राष्ट्रीय विक्रमाचे मानकरी ठरले आहेत.
सन 2017 मध्ये थायलंड येथे झालेल्या वल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिप टेस्ट स्पर्धेत प्युअर इकॉनॉमि टास्क प्रकारात मर्यादित इंधनाचा वापर करून एक तास अठ्ठावीस मिनिटे आणि एकोणचाळीस सेकंद (०१:२८:३९) इतका वेळ हवेत उड्डाण घेत ढुस यांनी हा इतिहास रचला आहे.
मे 2018 मध्ये जागतिक पॅरामोटर स्पर्धेत मर्यादित इंधनाचा वापर करून हवेतून सर्वात जास्त अंतर पार करणारे ढुस हे नुकतेच प्रथम भारतीय ठरले असताना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने ढुस यांच्या या पाचव्या विक्रमाची सुद्धा दखल घेतली आहे.
आप्पासाहेब ढुस यांच्या नावे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये तीन व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये एक असे या पूर्वी चार राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले असून.. आता पुन्हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने ढुस यांच्या या पाचव्या विक्रमाची घोषना केली असल्याने आप्पासाहेब ढुस यांच्यामुळे हवेतील साहसी क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देशाला एक वेगळी ओळख निर्माण झाली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
बालपणी इयत्ता सहावीत असताना म्हणजे सन 1984 साली पोत्याच्या बारदाण्या पासून तयार केलेल्या पतंगाच्या साह्याने घरावरून मारलेली पहिली उडी ते आज पावेतो अगदी तुटपुंज्या आर्थिक मदतिच्या जोरावर आप्पासाहेब ढुस यांच्या साहसी खेळाची कारकीर्द सतत गाजत राहिली आहे..
आप्पासाहेब ढुस यांच्या नावे सन 2009 मध्ये 12 हजार फुट उंच विमानातून 12 वेळेस उडी मारण्याचा पहीला राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला. तदनंतर सन 2016 मधील पॅरामोटर क्रीड़ा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एक रजत व दोन कास्य पदके जिंकून "भारत देशाला पहीले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून देणारा खेळाडू" ठरल्याबद्दल ढुस यांच्या नावे दुसरा राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला.. तसेच सण 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देश्याला सुवर्णपदक जिंकून देणारा "प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू" होण्याचा बहुमान प्राप्त करून त्यांनी तिसरा विक्रम नोंदविला. तदनंतर पॅरामोटर च्या साहाय्याने जागतिक स्पर्धेत मर्यादित इंधनात हवेतून 34 किलोमीटर अंतर पार करणारा प्रथम भारतीय होण्याचा बहुमान प्राप्त करून चौथ्या विक्रमाला ढुस यांनी नुकतीच गवसणी घातली असताना वल्ड पॅरामोटर चॅम्पियनशिप टेस्ट स्पर्धेत प्युअर इकॉनॉमि टास्क प्रकारात मर्यादित इंधनाचा वापर करून एक तास अठ्ठावीस मिनिटे आणि एकोणचाळीस सेकंद (०१:२८:३९) इतका वेळ हवेत उड्डाण घेत ढुस यांनी हा इतिहास रचला व कारकिर्दीतील पाचव्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे..
हवेतील साहसी क्री़डा प्रकाराच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ढुस यांनी देशाला आत्तापर्यंत एक सुवर्ण, एक रजत व दोन कास्य पदके जिंकून दिली असून .. तब्बल पाच राष्ट्रीय विक्रमांचे ते मानकरी ठरले आहेत.. तसेच तीन लाईफ टाईम अचिवमेंटही त्यांना प्राप्त झाल्या असून महाराष्ट्र शासनाने सन 2011-12 चा राज्यातील सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार देवून त्यांना सन्मानित केले आहे.
सोमवार दि. १७ डिसेंबर २०१८ रोजी दिल्ली येथे इंडिया बुक ऑफ रेकोर्ड च्या वतीने ढुस यांना त्यांच्या पाचव्या विक्रमाचे प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले जाणार आहे.
0 टिप्पण्या