विलास लाटे : पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची अवस्था बिकट झाली असून सद्यस्थितीत बंद असलेले हे उद्यान पूर्ववत सुरू करावे अशी मागणी क्रांतिसेनेचे राज्य सरचिटणीस नितीन देशमुख यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
मराठवाड्यात आलेल्या पर्यटकांना नाथसागर व संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान नेहमीच आकर्षण ठरले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पैठणमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांचा उद्यान बंद असल्याने हिरमोड होत असून जलसंपदा विभागाचा महसुलही बुडत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून कायम बंद अशी अवस्था या उद्यानाची झाली आहे. त्यामुळे या उद्यानाकडे पर्यटक येणे बंद झाले आहे.म्हैसूरच्या वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाची मांडणी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर संगीतावर आधारीत कार्यक्रम ही ठेवण्यात आले आहे. पर्यटनाच्या नकाशावर आलेले पैठणमधील हे उद्यान देशविदेशातून अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना नाथसागर जलाशयाच्या पायथ्याशी बांधण्यात आलेले संत ज्ञानेश्वर उद्यान हे कायम आकर्षण राहिले आहे.परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे सद्यस्थितीत या उद्यानाची अवस्था बकाल झाली असून मोठया प्रमाणात रोजगार बुडत आहे. हे उद्यान पुन्हा पूर्ववत पद्धतीने सुरू करून या उद्यानाला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी क्रांतिसेनेच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा शासनाविरुद्ध जनआंदोलन पुकारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा सूचक इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी क्रांतिसेनेचे राज्य सरचिटणीस नितीन देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख साईनाथ कासोळे, जिल्हा संघटक किशोर नाडे, सुनील कोल्हे, मनोहर निकम, अन्सर शेख, महंमद शेख, ज्ञानेश्वर सांगळे आदींची उपस्थिती होती.

0 टिप्पण्या