कृषी

उच्च वंशावळीच्या देशी गायी तयार करण्यासाठी भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून राहुरी परिसरातील खडांबे येथील संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यात संकरित गायीपोटी जन्मलेल्या उच्च वंशावळीच्या सहिवाल कालवडीची पाहणी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील यांनी केली.

शेतकर्यांशी संवाद साधतांना कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले पुण्यातील देशी गाय संशोधन केंद्र भारतातील एकमेव असे केंद्र आहे की, ज्याठिकाणी विविध दुधाळ देशी गायी गीर, सहिवाल, थारपारकर, राठी, रेड सिंधी यांची दुधाची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र काम करत आहे. शेतकर्यांनी आपल्या हवामानात तग धरणार्या व रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या दुधाळ देशी गायींचे संगोपन करणे गरजेचे आहे. देशी गायींचे शेण, गोमुत्र व दुध उच्च गुणवत्तेचे असून सध्याच्या काळात कॅन्सरसारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यासाठी ॲन्टीबायोटिकमुक्त दुध उत्पादन करणे गरजेचे आहे. यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीबरोबरच आपल्या हवामानात तग धरणार्या व रोगप्रतिकारक्षमता असणार्या दुधाळ देशी गायी कमी कालावधीत तयार करण्यासाठी आयव्हीएफ/भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे.

शेतकर्यांनी मुक्त गोठा, मुरघास तयार करण्यावर भर द्यावा. तसेच देशी गोपालनासंबंधी पंचक्रोशीतील गोपालकांनी पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्राला भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकात वरिष्ठ शास्त्रज्ञ व आयव्हीएफ/भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञान समन्वयक डॉ. विष्णू नरवडे यांनी सांगितले की, आयव्हीएफ तंत्रज्ञानातून तयार केलेले उच्च वंशावळीचे सहिवाल जातीचे भ्रुण (सहिवाल पिता SA-29 व दाता सहिवाल गाय S-9422) ऋतूचक्र नियमन केलेल्या संदीप कल्हापुरे यांच्या गोठ्यातील एच.एफ. गायीच्या गर्भाशयात भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानातून सोडण्यात आले. त्यातून 280 दिवसानंतर प्रत्यारोपित सहिवाल कालवडीचा जन्म झालेला आहे. कालवडीचे जन्मत: वजन 27 किलो असून प्रतिवेत दुध उत्पादन क्षमता 4000 ते 4500 लिटर असणार आहे.

कुलगुरु यांचे मार्गदर्शनाखाली आजपर्यंत 43 जातिवंत देशी कालवडींचा जन्म या तंत्रज्ञानातून झाला आहे. सरपंच श्री. ताकटे, श्री. माने, श्री. पानसंबळ, बाळासाहेब कल्हापुरे यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यापीठ करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. आभार प्रदर्शन संशोधन उपसंचालक डॉ. बाळासाहेब पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र निमसे, सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button