प्रासंगिक

कै.भारत व कै.रमेश तुकाराम गोपाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त…

राज्यात कोरोनासारख्या भयानक महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी त्यातीलच निमगाव खुर्दचे कै.भारत तुकाराम गोपाळे व कै.रमेश तुकाराम गोपाळे यांचीही प्राणज्योत मावळली व संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

भारत दादा व रमेश आण्णा यांचे वडील तुकाराम बाबा यांनी अकोले तालुक्यात बरीच वर्ष नोकरी केली व आईने विड्या बांधून संपूर्ण कुटूंबाला हातभार लावत योग्य दिशा दिली. घरची आर्थिक परिस्थिती तशी पूर्वीपासून बेताचीच होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संसाराचा गाडा नेटाने हाकला. विशेषकरून तुकाराम बाबा आपल्या दिलखुलास व मनमिळाऊ स्वभावामुळे ते अकोले-संगमनेर तालुक्यात आजही चांगले सुपरीचीत आहेत.

भारत दादा व आण्णा यांना वडिलोपार्जित थोडीशीच जमीन असूनही जिद्द व संघर्षातून भारत दादांनी दुग्ध व्यवसायात यशस्वी पदार्पण केले व रमेश आण्णा यांनी धांदरफळ येथे उदयोग व्यवसायात आपला जम बसविला. दोन्हीही भावंडे वेगवेगळ्या क्षेत्रात होती पण त्यांच्यात विचारांची एकी खुप घट्ट होती. खरे तर आजच्या परिस्थितीचा विचार करता सख्खा भाऊ पक्का वैरी ही समाजाची मानसिकता दोघांनीही अक्षरशः खोटी ठरविली.

दोन वर्षांपूर्वी अगोदर रमेश आण्णा यांना कोरोना लागण झाली व त्यातच त्यांचा अंत झाला. आपला लहान भाऊ आपल्या डोळ्यादेखत गतप्राण झाला हे दुःख भारत दादांना असह्य झालं होतं. ते मनाने पूर्ण खचले होते. त्यातच त्यांनाही कोरोनाने गाठलं व पंधरा दिवसात त्यांचीही प्राणज्योत मावळली.

भारत दादांविषयी सांगायचं झालं तर आपल्या पेक्षाही वयाने लहान असणाऱ्या नात्यातील सर्वांना ते एकेरी नावाने कधीच हाक मारत नसत तर प्रत्येक वेळी तुला ऐवजी तुम्हाला हाच शब्द त्यांच्या तोंडी असायचा. नातेसंबंधातील कुठलाही कार्यक्रम असो ते नेहमीच उपस्थित असायचे. गोपाळे कुटूंबातील ही दोन्हीही कर्ती मुलं आपल्या अगोदर गेली यापेक्षा मोठं दुर्दैव आईबापासाठी दुसरं काय असु शकतं.

परंतु सर्व दुःख अंतकरणात साठवून त्या मातापित्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना आधार दिला. कारण या कुटूंबातील कुणाचा तरी मुलगा, कुणाचा पती, कुणाचा चुलता, कुणाचा बाप, कुणाचा दीर, कुणाचा सासरा गेला होता. सर्वात मोठं दुर्दैव म्हणजे आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुःखात एकत्र संसाराचा गाडा ओढताना त्या गाड्याचं जसं अचानक एक चाक निखळुन पडावं व आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्या पतीच्या डोक्यावर आपलं डोकं ठेवून रडण्याचाही अधिकार त्या दोन्हीही पत्नीला मिळू नये यापेक्षा दुसरं मोठं दुःख काय असु शकतं.

भारत दादा व रमेश आण्णा यांच्या आजार पनापासून ते अंत्य संस्कारापर्यंत प्रत्येक संकटात त्यांचा मुलगा सचिन याने सर्वात जास्त सयंम दाखविला. डॉक्टरांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यात त्यांना यश आलं नाही. आत्ता रमेश अण्णा यांचा उद्योग व्यवसाय सचिन हाच यशस्वीरित्या संभाळत आहे. भारत दादा यांच्या पाठीमागे तीन मुलं असून तीनही चांगल्या नोकरीला आहेत. दोघांची लग्न झालेली आहेत. व रमेश आण्णा यांना दोन मुली व एक मुलगा असून या सर्वांचे अजुन शिक्षण चालू आहे. असा हा मोठा परिवार आहे.

जन्म म्हटला की मृत्यू हा असतोच हे तितकंच खरं असलं तरी अवकाशात चकाकणारे तारे असल्याशिवाय नभांगनाला शोभा नाही. त्याप्रमाणे कुटुंबातील हे दोन कर्ते तारे अनंतात विलीन झाल्याने साहजिकच दुःख खुप मोठं आहे. या दुःखातही आज तुकाराम बाबा कुटुंबासाठी वटवृक्षाचे खोड बनून तर ती माऊली ही वटवृक्षाची सावली बनून येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी जिद्दीने उभे आहेत.

पूर्वी निमगावला काही कामानिमित गेलो तर रस्त्याने जाताना भारत दादांच्या गाडीला दुधाच्या किटल्या व उसाची मोळी वा मकाची मोळी असायची. मग घरी चहासाठी आग्रह व्हायचा. मी घाईत आहे असं बोलल्यावर मग ते तेथेच गाडी लावून मला हॉटेलमध्ये चहासाठी घेऊन जायचे. आजही निमगाव मधून जात असताना भारत दादांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. त्याचप्रमाणे रमेश आण्णा यांनीही आपल्या उद्योग व्यवसायात दुकानात येणाऱ्या गिऱ्हाईकांना चांगली सेवा व चोख व्यवहार ठेवून विश्वास संपादक केला व आपल्याला कोणतीही वस्तू लागली तर ते ती वस्तू दुकानातुन लक्षपूर्वक घरी आणायचे व आपल्याला घरून घेऊन जा असं सांगायचे.

खरोखरच माणसं ही कर्तृत्वाने, संघर्षाने व संस्काराने मोठी होतात, त्याचं उदाहरण म्हणजे ही दोन भावंडे होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला… या उक्तीप्रमाणे दादा व आण्णा यांना आपल्यातुन जाऊन दोन वर्षे लोटली. शरीराने आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या कर्तृत्वाची शक्ती इथून पुढील काळात नक्कीच आपल्याला सावली देत राहिल यात तिळमात्र शंका नाही. पुनर्जन्म आहे की नाही हे मला नक्की ठाऊक नाही 

पण पुनर्जन्म जर असलाच तर या दोघांचाही या प्रवरा माईच्या कुशीतुन पुन्हा जन्म व्हावा अशी भगवंताकडे प्रार्थना करूया. कै.भारत तुकाराम गोपाळे (दादा ) व कै.रमेश तुकाराम गोपाळे (आण्णा) यांना द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…!

 बाळासाहेब भोर; अ.भा.क्रांतीसेना, संगमनेर

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button