अहमदनगर

नाशिक-नगर-सोलापूर ग्रीनफिल्ड हायवेसाठी राहुरीतील १९ गावातून शेतकऱ्यांनी घेतल्या ६०० हरकती

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : सुरत हैदराबाद या महत्त्वाकांक्षी सहापदरी ग्रीनफिल्ड हायवे मधील भूसंपादन बाबत राहुरी तालुक्यातील १९ गावातून ६०० हरकती शेतकऱ्यांनी दाखल केल्या आहेत. हरकतीना २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदत असून राहुरी तालुक्यातील ४४ किलोमीटरमधील ५३० सर्व्हेतून शेतकऱ्यांच्या बागायत जमीन जाणार आहेत.

१ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरत -नाशिक -अहमदनगर या सहा पदरी (नंतर आठ पदरी ) ग्रीनफिल्ड हायवेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात संबंधितांना २१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती मागवल्या आहेत. या अधिसूचनेत भूसंपादनासाठी हस्तांतरण करण्यात येणाऱ्या गावातील सर्वे नंबर प्रसिद्ध झाल्याने संबंधित शेतकरी व सर्वे नंबर मधील ग्रामस्थांनी हरकतीसाठी संबंधित कार्यालयाकडे धाव घेतली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संबंधित शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकारी स्तरावर राहुरी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार प्रांताधिकारी व सक्षम अधिकारी ( भूसंपादन ) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे तहसीलदार यांनी स्वतंत्र कक्ष तयार केला. गुरुवारी उशिरापर्यंत या विशेष कक्षात राहुरी तालुक्यातून सुमारे ६०० हरकती दाखल झाल्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या हरकतीमध्ये बागायती जमिनींना देण्यात येणारा मोबदला समृद्धी महामार्गाच्या तत्त्वांवर देण्यात यावा, या हायवेलगत दोन्ही बाजूने सर्विस रोड करण्यात यावा, गुगल मॅप व प्रसिद्ध झालेले सर्वे नंबर यात मोठ्या प्रमाणात विसंगती व तफावत आहेत, अनेक सर्वे नंबरमधील शेतकऱ्यांचे स्थानिक व कौटुंबिक वाद आहेत,  विहिरी, झाडे गायीचे गोठे, रस्ते वहिवाट या व अन्य बाबींवर शेतकऱ्यांनी हरकती व आक्षेप नोंदवला आहे.
राहुरी तालुक्यातील १९ गावातील ४४ किलोमीटर अंतरातील ( कि.मी. २४९ ते  कि.मी. २९२) ४२८ हेक्टर क्षेत्रांचे हायवे साठी भूसंपादन केले जाणार आहे. त्यामध्ये राहुरी शहरातील ३६ सर्वे नंबरचे क्षेत्र तसेच चिंचविहिरे- ७, धानोरे- ६, डिग्रस- १५, कानडगाव- ३३, कणगर- ६५, खडांबे -३५, माळेवाडी- डुकरेवाडी -५६, मल्हारवाडी- २, मोमीन आखाडा- ३०, राहुरी खुर्द- १४, सडे- ३१, सोनगाव- ६४, वडनेर- ८, तांभेरे – ३५, तांदूळनेर – २३ तर वांबोरी येथील सर्वांधिक ६६ सर्वे नंबर मधील जमिनींच्या क्षेत्रांचे एनेचएआय प्रतिनिधी, स्थानिक तलाठी, सिटीसर्व्हे व महसूल यांच्या उपस्थितीत मोजणी करून भूसंपादन केले जाणार आहे. 
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड हायवेबाबत एनएचएआयने पुढाकार घेऊन हायवेत जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेऊन समृद्धी महामार्ग तत्वानुसार मोबदल्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा.
_भगवान मोतीराम मैड, शेतकरी,राहुरी.

Related Articles

Back to top button