महाराष्ट्र

EPS95 पेंशनधारकांचे प्रश्न 31 ऑक्टोंबर पूर्वी निकाली न निघाल्यास पुढील संघर्षास तयार रहा-कमांडर अशोक राऊत

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे) EPS95 पेंशनधारकांचे शिष्टमंडळास केंद्र सरकारने दिलेले आश्वासन केंद्र सरकारने त्वरीत पूर्ण करून या वृध्द पेंशन धारकांना तातडीने न्याय द्यावा , 31 ऑक्टोबर पर्यन्त प्रश्न निकाली निघाला नाही तर पुढील संघर्षासाठी सज्ज रहा असे प्रतिपादन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी केले आहे. ते आज जामनेर येथील मार्केट यार्ड मधील सभागृहात आयोजित EPS 95 पेंशन धारकांचे सभेत बोलत होते. जळगाव जिल्हा अध्यक्ष इंजि. अरविंद भारंबे, जिल्हा सचिव डी एन पाटील यांचेसह सेवानिवृत्त एसटीअधिकारी एन एम सरोदे, ताराचंद पाटील यांची विशेष उपस्थिती होती. आयोजकांनी बुलडाणा टीम सह सर्व मान्यवरांचे स्वागत केले. 

केंद्र सरकारने १९९५ पेन्शन योजना ही औद्योगिक क्षेत्रातील, एसटी, विडी, वीज, साखर, सहकार, वस्त्रोद्योग, एचएएल आदी १८६ विभागांचा समावेश  असलेल्या कामगारांसाठी लागू केली व ही योजना किती लाभदायी आहे या बाबतची संपूर्ण पानांची जाहिरात देशांतील प्रमुख वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. या जाहिरातीलाच आज EPFO ने हरताळ फासला असून या निवृत्त कामगार कर्मचाऱ्यांना 300 रुपयापासून जास्तीत जास्त 2500/- रुपयांपर्यंत तुटपुंजे पेन्शन मिळत आहे. या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांचे नेतृत्वात EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने देशभर विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आलीत  व  देशांतील अनेक खासदार, मंत्री तसेच पंतप्रधान यांचे पर्यंत ही समस्या पोहचविण्यात आलीत. 04 मार्च 2020 व 5 ऑगस्ट 2021 अशी दोन वेळा प्रधानमंत्री मोदी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. त्यावेळी या दृष्टीने काम सुरू असल्याचे पंतप्रधान यांनी सांगितले आहे. मात्र अजून ही सकारात्मक निर्णय न झाल्याने संघटनेचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात गेल्या 1012 दिवसापासून हे पेंशन धारक साखळी उपोषण करित आहेत. या कालावधीत आलेल्या ऊन, पाऊस, थंडी, कारोना अशा अनेक अडचणींचा  सामना करीत हे साखळी उपोषण सुरु आहे.

किमान प्रत्येकी ७५०० रुपये पेन्शन दरमहा व त्यांवर महागाई भत्ता मिळालाच पाहिजे, पूर्ण पगारावर उच्चतम पेंशन बाबत 31.05.2017 चे परिपत्रक रद्ध करावे, वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत, जे पेंशन धारक या योजने पासून वंचित आहेत त्यांंना पूर्वलक्षी प्रभावाने सभासद करून घ्यावे किंवा दरमहा रु 5000/-  पेंशन द्यावी, आदी मागण्या या पेंशन धारकांच्या आहेत. राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ पी एन पाटील, महीला फ्रंट च्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरस, पश्चिम क्षेत्र महीला समन्वयक सौ सरीताताई नारखेडे, NAC चे नेते सरोदे साहेब, चौधरी यांचेसह अनेकांची समयोचीत भाषणे झाली. जामनेर मधील या पहिल्याच सभेला सुमारे 250 ते 300 पेंशनधारक उपस्थित होते.
सुत्र संचालन एच एन व्यवहारे यांनी केले तर तालुका अध्यक्ष सुपडू सपकाळे, उपाध्यक्ष डी बी वानखेडे, सचिव एच एन व्यवहारे, सहसचिव सुभाष पाटील, खजिनदार संतोष पाटील, कार्याध्यक्ष मोरे अण्णा, प्रसिद्धी प्रमुख अशोक सिनकर, त्र्यंबक पाटील, कांतीलाल जावडा यांचे सह अनेकांनी मेहनत घेतली.

Related Articles

Back to top button