कृषी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या- पारनेर किसान कॉंग्रेसची मागणी

पारनेर प्रतिनिधी : गुलाब चक्रिवादळामुळे पडलेल्या अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या वादळामुळे चांगलाच फटका बसला आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्वरित पंचनामे करावे व तात्काळ पीक विमा रक्कम, आर्थिक मदत म्हणून भरिव निधी शेतकऱ्यांना देण्यात यावा, अशा मागणीचे पारनेर किसान कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाजीराव गागरे यांच्या नेतृत्वाखाली पारनेरचे नायब तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केले आहे की, गेले काही दिवसांपासून गुलाब चक्रि वादळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धो-धो पाऊस पडला आहे. या पावसामुळे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन वित्तहानी झाली आहे. तालुक्यातील पळशी, वनकुटे, सिध्देश्वरवाडी, हातलखिंडी, वडझिरे, वेसदरे, वडनेर बु., करंदी, कान्हुर पठार, पाडळी दर्या आदी गावांमध्ये चक्रिवादळाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी करून सर्वच गावांमध्ये त्वरित पंचनामे करावे व तात्काळ आर्थिक मदत म्हणून भरिव निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावी. तसेच पिक विमा रक्कम ही शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन पारनेर किसान कॉंग्रेसच्या वतीने ३० सप्टेंबर २०२१ रोजी देण्यात आले.

यावेळी अहमदनगर किसान कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव देठे पाटील, पारनेर कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, कृषी आत्मा कमीटीचे सदस्य सिताराम देठे, रामकृष्ण पवार, विकास साळवे, संपत जाधव, भास्कर देठे, संतोष देशमुख, सुदाम दरेकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते.

Related Articles

Back to top button