गुन्हे वार्ता

सामाजिक माध्यमावर द्वेषमुलक लेख; राहुरीत गुन्हा दाखल, अशा पोष्ट टाकल्यास कडक कारवाई – पो. नि. दराडे

राहुरी | बाळकृष्ण भोसले – सामाजिक माध्यमावर दोन जातीत जातीय तेढ निर्माण होईल असा लेख टाकल्याप्रकरणी तालुक्यातील सात्रळ येथील तरूणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. दरम्यान अशा पोष्ट टाकून जातीय तेढ अथवा धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्याविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी दिला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवाज असिफ इनामदार रा. सात्रळ या तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सात्रळ येथील जयेश बाळासाहेब वाघचौरे याने दोन जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने जाणिवपुर्वक व्हाटसअप ग्रुपवर व्देषभावना पसरविणारा लेख टाकला. त्यामुळे जातीय तणाव  निर्माण झाला वगैरे फिर्यादी वरुन भादंवि कलम १५३(अ), ५०५(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई ना-हेडा करत आहे.
दरम्यान जातीय व धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोष्ट तरूणांनी आपल्या सामाजिक माध्यमांवरून टाकण्याचे टाळावे. शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे, तशीच किंबहुना जास्त जबाबदारी आजच्या तरूणांचीही आहे, अशा बातम्या अथवा लेख आपापल्या गृपवरून काढून टाकावेत व असे लेख पाठविणारे जे असतील त्यांना गृप ॲडमिन यांनी सक्त सूचना द्याव्यात अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी दिला आहे.
तालुक्यात महिला मुलींच्या संरक्षणार्थ श्री दराडे यांनी पिडीतांना संपर्क करण्याचे आवाहन केले होते. त्यानुषंगाने रोडरोमीयो व अन्य टारगटांना सध्यातरी मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे. त्याधर्तीवर या प्रकरणी दराडे यांनी कडक भुमिका स्विकारल्याने जातीय व धार्मिक कारणावरून तेढ निर्माण होणार नाही असा सूर जनतेतून उमटत आहे.

Related Articles

Back to top button