अहमदनगर

चांगलं कार्य, कर्तृत्वशील व्यक्तीचा सन्मान ही संस्कृती रुजावी – सौ. मंजुश्री मुरकुटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : व्यक्ती ही समाजाची शक्ती असते. या शक्तीला प्रेरणा मिळाली की व्यक्तीच्या कार्य, कर्तृत्वशील जाणिवेला संधी मिळते. सार्थक सुकळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्याच्या पुढच्या गुणवत्तेला प्रेरणा देणे होय, अशी सन्मान संस्कृती रुजली पाहिजे, असे विचार अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका व अशोक इंग्लिश मेडियम स्कुल अँड ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्टस्च्या सचिव सौ. मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे यांनी व्यक्त केले.

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सार्थक गणेश सुकळे याचा अशोक इंग्लिश मेडियम स्कुलमधील दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल अशोकनगर फाटा येथे सौ.मंजुश्री मुरकुटे व माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. मंजुश्री मुरकुटे बोलत होत्या. प्रारंभी स्व. नामदेवराव सुकळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. सार्थक सुकळे याच्या शैक्षणिक प्रगतीचा परिचय करून दिला.

यावेळी साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीमती कस्तुरबाई सुकळे, गणेश सुकळे, सौ.शिल्पा सुकळे, कु. साईसा सुकळे, सौ. मधुरा कुंदे, सौ.रुपाली शिरसाठ, सौ. अनिता शिंदे – घोगरे, गणेश हळनोर, सिकंदर शेख आदी उपस्थित होते. सार्थक सुकळे यास प्रतिष्ठानतर्फे 1001 चा चेक, गौरवचिन्ह, शाल, बुके, पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला. सौ. रुपाली कुंदे, गणेश ह्ळनोर यांनी मनोगत व्यक्त केले.

सौ. मंजुश्री मुरकुटे आपल्या मनोगतात पुढे म्हणाल्या, अशोक कारखान्याचे चेअरमन आणि आमचे प्रेरणास्थान असणारे माजी आमदार भानुदास मुरकुटे साहेब यांनी ग्रामीण विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिक्षणक्षेत्राला महत्व दिले, त्यांच्या दूरदर्शीपणामुळे, शिस्तबद्ध व्यवस्थापनामुळे गुणवत्तेला प्राधान्य मिळते. सार्थकसारखे विद्यार्थी उच्च गुणवत्ता प्राप्त करतात. याच विद्यार्थी हितासाठी ज्यूनिअर कॉलेज सुरु केले, त्यास चांगला प्रतिसाद आहे. फार्मसी कॉलेज सुरु होत आहे. असे सांगून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.

डॉ. बाबुराव उपाध्ये, प्राचार्य शेळके, सुखदेव सुकळे यांनी वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळावी म्हणून सर्वांना पुस्तके भेट दिल्याबद्दल सौ. मुरकुटे यांनी आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून हनुमानाची शक्ती जागृतकथा सांगितली. समुद्र पार जाण्यासाठी सर्वांनी हनुमानाची स्तुती केली आणि हनुमानाने उड्डाण केले. अशीच प्रेरणा प्रत्येक विद्यार्थी व चांगले काम करणाऱ्यास मिळाली तर असाध्य ते साध्य होते, त्यातून समाजविकास होतो, असे सांगून सुकळे परिवाराचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सार्थक सुकळे याने आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button