शिक्षणाचा उपयोग वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा : राज्यपाल जिष्णु देव वर्मा


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 39 वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

राहुरी विद्यापीठ : विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी करावा. तसेच नवोन्मेष, उद्योजकता आणि तंत्रज्ञानाधिष्ठित उपायांच्या माध्यमातून शाश्वत कृषि विकास साधावा. कृषिचे पदवीधर विविध आव्हानांना सामोरे जात शाश्वत कृषि विकासाचा मार्ग दाखवतील, असा मला विश्वास आहे. मी विद्यार्थ्यांना नवोन्मेष, उद्योजकता आणि समाजाभिमुख कार्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो. भारतीय कृषिचे भविष्य तंत्रज्ञानाधिष्ठित उपाय, स्टार्ट-अप्स, कृषि उद्योग व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींमध्ये दडलेले आहे. आपल्या शिक्षणाचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर ग्रामीण समाज उन्नतीसाठी व्हावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या 39 व्या पदवीप्रदान समारंभात अध्यक्षस्थानावरुन स्नातकांना उद्देशुन मार्गदर्शन करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप-भारतीय कृषि संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि भाकृअप-भाकृसंसं अनुवंशशास्त्र विभागाचे मानद शास्त्रज्ञ डॉ. अशोक कुमार सिंग उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, नागपूर येथील म्हाफसूचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील, कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील, राज्यपालांचे खाजगी सचिव पवनसिंग, ए.डी.सी. अभयसिंग देशमुख, मुख्यमंत्र्याचे ओ.एस.डी. दिलीप राजुरकर, कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, जी. मल्लीकार्जुन, डॉ. शिल्पा प्रतापसिंह पाटील, डॉ. के. सामी रेड्डी, आ. हेमंत ओगले, विद्या परिषद सदस्य राजेंद्र पवार, डॉ. के.ई. लवांडे, डॉ. पी.एन. रसाळ, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, नियंत्रक सदाशीव पाटील आणि विद्या शाखेच्या उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी राज्यपाल जिष्णु देव वर्मा मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले 1969 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाने मागील पाच दशकांत कृषि विकासात महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून सुमारे 1.5 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळ घडविले आहे. विद्यापीठाने 320 उच्च उत्पादक वाण, 56 कृषि अवजारे आणि 1925 सुधारित शेती तंत्रज्ञान विकसित करून शेतकर्यांपर्यंत पोहोचविले आहे. तसेच 6284 वनस्पती जनुकसंपत्तीचे जतन करण्यात आले आहे. विद्यापीठाने नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी घेतलेले दूरदर्शी पाऊल कौतुकास्पद आहे. प्रात्यक्षिके व अनुभवाधारित युनिट्समुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळत असून शिक्षण, संशोधन आणि समाजसहभाग यांचा समन्वय साधणारी नैसर्गिक शेतीची सशक्त परिसंस्था निर्माण होत आहे.

या उपक्रमांमुळे नवकल्पना, आंतरशाखीय सहकार्य आणि शेतकरी-संस्थांमधील भागीदारी बळकट होत आहे. शाश्वत उपाय शोधणे, स्थानिक ज्ञान समृद्ध करणे आणि कृषि विकासात योगदान देणे यासाठी तरुणांना प्रेरणा मिळत आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांच्या परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचे प्रतीक असून ते भारतीय कृषिचे भावी नेतृत्व आहेत. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यातील योगदानाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी ते म्हणाले की आधी जय जवान, जय किसान, जय विज्ञान असे होते आता यात पंतप्रधान यांनी जय अनुसंधानाची जोड दिली आहे. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांना कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत करण्यात आले. यावेळी कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या 39 व्या पदवीप्रदान समारंभात उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे. डॉक्टर ऑफ सायन्स ही मानाची पदवी बहाल केल्याबद्दल मी विद्यापीठ व राज्यपाल महोदयांचे मनःपूर्वक आभार मानतो. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार कृषि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवत आहेत. राज्यातील शेतकर्यांना जलसुरक्षा आणि उर्जासुरक्षा देणे ही या सरकारची प्राथमीकता आहे. याकरीता उर्जा सुरक्षा योजनेच्या माध्यमातून या वर्षाच्या शेवटी शेतकर्यांना दिवसा 12 तास मोफत विजेचा पुरवठा करणार आहोत. सध्या शेतीसमोरील वातावरणातील बदल हे मोठे संकट आहे. वातावरणातील बदलामुळे हंगामामध्ये बदल होऊन पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. यावर पर्याय म्हणजे जैव तंत्रज्ञानाची मदत घेवून वातावरणातील बदलाला तोंड देणार वाण विकसीत करण्यात भर द्यावा लागेल. महात्मा फुले कृषि विद्यापीठ 126 पिकांवर संशोधन केले आहे. विद्यापीठाने 320 विविध वाणांची निर्मिती केली आहे. या विद्यापीठाने तयार केलेल्या रब्बी ज्वारीच्या वाणांखाली महाराष्ट्रातील 25 टक्के क्षेत्र आहे. राज्यातील 75 टक्के शेतकरी अल्पभुधारक असून त्याला डोळ्यासमोर घेवून आपण संशोधन करु. पुढील काळात शेती मालाला भाव मिळण्यासाठी उत्पादकता वाढवावी लागेल, उत्पादन खर्च कमी करावा लागेल तसेच मुल्यवर्धनाची साखळी तयार करावी लागेल. याचबरोबर कृषि तंत्रज्ञानावर आधारीत विविध उद्योग सुरु करावे लागतील. शेतीमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता या डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे खर्चामध्ये 25 टक्क्यांपर्यत बचत होऊन उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांपर्यत वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. चारही कृषि विद्यापीठांच्या मदतीने आपण महाविस्तार ॲप तयार केले आहे. या ॲपला 30 लाख शेतकरी जोडले गेले असून यावर शेतकर्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळत आहे. या वर्षाच्या शेवटी या योजनांचा लाभ शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्यात आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शेतीत नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यांचा संगम घडवून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. आज पदवी प्राप्त करणार्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन. अनेक वर्षांच्या परिश्रमांनंतर तुम्ही आज हा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याच्या माध्यमातून शेतकर्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या मदतीने कृषि क्षेत्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही केवळ पदवीधर नाही तर कृषि विकासाचे दूत आहात. मोठी स्वप्ने पाहा, कठोर परिश्रम करा आणि शेतकरी व समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

याप्रसंगी राज्याचे कृषि मंत्री तथा कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती दत्तात्रय भरणे म्हणाले की, वातावरणातील बदलामुळे शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यावर मात करण्यासाठी कृषि क्षेत्रात आमुलाग्र बदल करून नवे तंत्रज्ञान स्विकारावे लागेल. मुंबई येथे झालेल्या कृत्रिम बुध्दीमत्तेवर घेतलेल्या परिषदेने दाखवून दिले की शेतीला कृत्रिम बुध्दीमत्तेशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की आपण कृषि शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहात. त्यामुळे आपण केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न राहता कृषि उद्योजक बनण्याचा संकल्प करावा. कृषि क्षेत्रामध्ये अन्नप्रक्रिया, मूल्यवर्धन, कृषि सेवा केंद्र, स्टार्टप्स, कृषि पर्यटन, सेंद्रिय शेती यासारख्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा उपयोग करून आपण रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनू शकता. कृषि पदवीधरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांच्या उन्नतीसाठी, ग्रामीण विकासासाठी आणि देशाच्या अन्नसुरक्षासाठी करावा. शेतीच्या संदर्भात विविध योजना शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा तुम्ही प्रयत्न करा असे आवाहन कृषिमंत्र्यांनी यावेळी केले.

प्रमुख पाहुणे डॉ. अशोक कुमार सिंग आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की, आज पदवी व पारितोषिके प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत स्मरणीय क्षण असून त्यांच्या कठोर परिश्रमाचे हे फलित आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषि क्षेत्राचा मोठा वाटा असून देशाच्या जीडीपीमध्ये 18.2 टक्के तर रोजगारामध्ये 45.6 टक्के योगदान या क्षेत्राचे आहे. 1950-51 मध्ये 50.82 दशलक्ष टन असलेले अन्नधान्य उत्पादन 2024-25 मध्ये 357.73 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले. हरित क्रांतीनंतर सुधारित वाण, आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य धोरणात्मक पाठबळामुळे उत्पादनक्षमतेत मोठी वाढ झाली आहे. मात्र वाढती लोकसंख्या, हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि मृदा ह्रास यांसारख्या आव्हानांमुळे कृषि क्षेत्रात वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुधारित वाणनिर्मिती, जीनोम एडिटिंग, बायोफोर्टिफिकेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान व काटेकोर शेती यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शाश्वत शेती साध्य होऊ शकते. आपण संशोधन, शासकीय सेवा, कृषि उद्योग, ग्रामीण विकास किंवा उद्योजकता या कोणत्याही क्षेत्रात कार्य केले तरी लक्षात ठेवा-कृषि ही केवळ एक व्यवसाय नाही, तर मानवतेची सेवा आहे. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान शेतकरी व ग्रामीण समाजाच्या विकासासाठी वापरावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी विद्यापीठ अहवाल सादर करताना सांगितले की, विद्यापीठाने संशोधन, शिक्षण व विस्तार या तीनही क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केली आहे. शेतकर्यांना उपयोगी ठरणार्या 1925 तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या 320 वाणांची निर्मिती व 56 कृषि अवजारे व यंत्रांची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. राहुरी कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या प्रमुख 9 पीकांच्या उदा. ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा, भात, लिंबू, बाजरी वाण आणि मोसंबी या वाणांचे आर्थिक विश्लेषण केले असता या 9 पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये ढोबळमानाने एकुण रु. 3,98,090 कोटी व निव्वळ 51,146 कोटी रुपये इतक्या महसुली उत्पन्नाची भर पडली आहे. विद्यापीठाने बदलत्या हवामानाला अनुरुप असे शेतकरीभिमुख संशोधन केलेले आहे. नवोन्मेष व विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यापीठाने स्पर्धा परिक्षा मंच, उद्योजकता विकास मंच आणि हायटेक शेती मंच स्थापन केले आहेत. हे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाणांसाठी तयार करुन त्यांना नोकरी शोधाणार्यांऐवजी नोकरी निर्माण करणारे बनवण्यास प्रोत्साहन देतात. या व्यतिरिक्त कृषि विद्यापीठ कृषि विस्तारामध्ये नवनविन उपक्रम राबवित आहे.

यावेळी राज्यपाल तथा कृषि विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी 74 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 346 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4,182 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 4,602 पदव्या प्रदान केल्या. पदवी प्रदान सन 2024-25 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. निकिता गोंडल, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. वैष्णवी शिंदे, कृषि अभियांत्रिकी मध्ये प्रथम आलेला चि. प्रज्वल येळवंडे यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी पीएच.डी.च्या 4 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदव्युत्तर पदवीच्या 21 विद्यार्थ्यांना सुवर्ण, पदवीच्या 12 विद्यार्थ्यांना सुवर्ण व दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदन आणि दिप प्रज्वलनाने करण्यात आली. पदवीप्रदान समारंभाला अहिल्यानगरचे शिर्डी येथील लोकसभा सदस्य भाऊसाहेब वाकचौरे, शेवगांव येथील विधानसभा सदस्य श्रीमती मोनीका राजळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, जिल्हाधिकारी पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद भंडारी, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, माजी कुलगुरु डॉ. सुभाष पुरी, डॉ. आर.बी. देशमुख, डॉ. शंकरराव मगर, डॉ. अशोक ढवण, डॉ. किसनराव लवांडे, डॉ. व्यंकटेश मायंदे, माजी आ. चंद्रशेखर कदम, डॉ. हरी मोरे, कृषिभुषण सुरसिंग पवार, विद्या परिषद सदस्य, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी, विद्यार्थीनी व प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी कृषि प्रदर्शनाला भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या