युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण भोसले यांची निवड
राहुरी | प्रतिनिधी : नगर येथे झालेल्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली.
संघाचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रभंजन कनिंगध्वज यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत बाळकृष्ण भोसले यांच्या नावाची सूचना प्रभंजन कनिंगध्वज यांनी मांडली. त्याला सुभाष कोंडेकर यांनी अनुमोदन दिले. बैठकीत एकमताने निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
त्याचबरोबर मार्गदर्शक पदी ज्येष्ठ संपादक दिपक मेढे, प्रमुख मार्गदर्शक पदी प्रभंजन कनिंगध्वज, उपाध्यक्ष व दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी अशोक तांबे, जिल्हा सचिवपदी राजेंद्र म्हसे, जिल्हा समन्वयक पदी रोहीत गांधी, जिल्हा समन्वयक (महिला) पदी सौ. चैताली हारदे, जिल्हा सदस्य पदी महेश भोसले, उमेश साठे यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिपक मेढे पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, पत्रकारांपुढे सध्या मोठे आव्हान आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांना बातम्यांच्या माध्यमातून अनेक संकटाना सामोरे जावे लागते. त्यावेळी तुमच्या पाठीशी वर्तमान पत्र उभे राहत नाही. पण संघटना मजबुत असेल तर त्या पत्रकाराला न्याय देण्यासाठी संघटना निश्चितपणे त्याच्या बाजूने उभी राहून न्याय देण्याचा प्रयत्न राहीलं अशी ग्वाही जेष्ठ पत्रकार दीपक मेढे यांनी दिली.
प्रसंगी जिल्हाध्यक्ष भोसले यांनी ग्रामीण पत्रकारांच्या समस्याबाबत ऊहापोह करताना संघटनेचा उद्देश नेहमीच न्याय देण्याचा राहिला असून पत्रकारांबरोबरच ग्रामीण जनतेच्या प्रती संघ समर्पित भावनेने काम करत असल्याचे सांगितले. संघाच्या १८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होत असलेल्या अधिवेशनासाठी जिल्ह्यातून जास्तीत जास्त पत्रकार बांधव उपस्थित राहणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्रभंजन कनिंगध्वज, नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे, अशोक तांबे, रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीला राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, राहाता तालुकाध्यक्ष सुभाष कोंडेकर, पारनेर तालुकाध्यक्ष शरद रसाळ, सौ. चैताली हारदे, राहुरी तालुका सचिव रमेश जाधव यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.