पवित्र मरीयेसारखे आदर्श जीवन जगावे – फा. शेळके
हरेगाव मतमाउली यात्रापूर्व पाचवा शनिवार नोव्हेना संपन्न
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज आपण “पवित्र मरिया युवकांचा आदर्श” हा विषय घेऊन नोव्हेनाचा पाचवा शनिवार साजरा करीत आहोत. पवित्र मरिया खरेच आपल्या सर्व युवकांसाठी एक आदर्श असे स्थान आहे. तिचे जीवन जर पाहिले तर आपल्याला प्रत्यय येतो की पवित्र मरीयेला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे ती जीवन जगली. परमेश्वराच्या शब्दाला तिने होकार दिला आणि त्यानुरूप जीवनात किती संकटे आली त्याला ती घाबरली नाही. परमेश्वर बरोबर आहे ही जाणीव तिच्या मनामध्ये नेहमीच होती. परमेश्वराचे शब्द ऐकून त्याप्रमाणे ती जीवन जगत गेली.
परमेश्वराला वाढवणे सोपी गोष्ट नव्हती. येशू ख्रिस्ताला वाढविताना तिला बऱ्याच दु:खाना समोरे जावे लागले. ते सर्व झेलत होती आणि परमेश्वर बरोबर आहे ही जाणीव तिला नेहमीच होत होती. बऱ्याच वेळा चिंता, विवंचना यांना तोंड देताना परमेश्वरावरचा विश्वास तिने दाखवला म्हणून आपल्या लेकराला वाचविण्यासाठी या ठिकाणाहून त्या ठिकाणी स्थलांतर केले आणि आपल्या लेकराला तिने वाचविले. पर्यायाने आपण पाहतो तारणारा त्याची ती माता बनली आणि त्याव्दारे तीने दाखवून दिले की प्रत्येक वेळी आपल्या जीवनामध्ये संकटे आली आपण डगमगायचे नाही. त्या परमेश्वरावर विश्वास ठेवायचा. अगदी आपल्या पुत्राचे दु:ख सहन तिने आपल्या डोळ्याने पाहिले. तरी ती डगमगली नाही परमेश्वराची इच्छा प्रमाण मानली.
क्रुसावर मरताना त्याही वेळी परमेश्वरावर तिने श्रद्धा ठेवली. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आपल्या या नातीला आपल्या या प्रेषितांच्या हवाली करतो व सांगतो ही पहा तुमची माता व अशा प्रकारे ती सर्वांची माता बनली. आपण पुनरुत्थानानंतर पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या या प्रेशिताना भेटताना पवित्र मरिया त्याचेबरोबर होती. ती दु:खातही बरोबर होती. आनंदाच्या समयी आपल्या शिष्यांबरोबर होती आणि पुन्हा पवित्र आत्मा शिष्यांवर उतरल्यानंतर आपल्या समोर युवकांसमोर त्याही वेळेस ती बरोबर होती. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की पवित्र मरिया आपल्यासमोर युवकांसमोर आदर्श आहे.
आपल्या जीवनात नाना संकटे दु:ख येतात. पण आपण न घाबरता पवित्र मरीयेसारखे जीवन जगलो तर नक्कीच आपण आंनदी होवू आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन रे फा राजू शेळके यांनी मतमाउली यात्रापूर्व पाचव्या नोव्हेना शनिवार प्रसंगी केले.
यावेळी फा.प्रकाश राउत, रिचर्ड अंतोनी, ओल्विन कलघटकी, हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, आदी धर्मगुरू,व धर्मभगिनी सहभागी होते. येत्या सहाव्या शनिवारी डॉन बास्को चर्च सावेडी, संत जॉन चर्च, भिंगार, संत अन्ना चर्च अहमदनगर येथील धर्मगुरू पवित्र मरिया कराराचा कोश या विषयावर प्रवचन करणार आहेत. सर्व भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ व सर्व धर्मगुरू यांनी केले आहे.