बाबुर्डी घुमट येथे काटेकोर पाणी व्यवस्थापन या विषयावरील प्रशिक्षण संपन्न
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाद्वारे पुरस्कृत विद्यापीठ प्रणालीद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुपयोगासाठी सहाय्य प्रकल्प अंतर्गत बाबुर्डी घुमट, जि. अहमदनगर येथे एक दिवसीय काटेकोर पाणी व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबुर्डी घुमट गावच्या सरपंच सौ. नमिता राहुल पंचमुख या होत्या. या एक दिवसीय प्रशिक्षणात प्रकल्पाचे संशोधन सहयोगी इंजि. अभिषेक दातीर यांनी पिकांच्या पाण्याची गरज काढण्यासाठी फुले इरिगेशन शेड्युलर मोबाईल ॲपचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. संशोधन सहयोगी इंजि. तेजश्री नवले यांनी प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आयोटी तंत्रज्ञानाचा वापर काटेकोर पाणी व्यवस्थापनाकरिता कसा करावा या तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. शुभांगी घाडगे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या काटेकोर शेतीसाठी मोबाईलचा वापर याविषयी माहिती दिली. या प्रशिक्षणाचे आयोजक म्हणुन कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाद्वारे पुरस्कृत विद्यापीठ प्रणालीद्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुप्रयोगासाठी सहाय्य प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणासाठी बाबुर्डी घुमट गावातील 60 शेतकरी उपस्थित होते.