कांदा निर्यातीला परवानगी देऊन दुधाचा दर 50 रुपये करा – सुरेशराव लांबे पाटील
राहुरी – कांदा निर्यात त्वरित सुरू करून शेतकऱ्यांच्या दुधाला किमान 50 रुपये दर देऊन राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुध दर अनुदानासाठी घातलेले निकष रद्द करुन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित अनुदान जमा करण्यात यावे, अशा मागण्यांचे लेखी निवेदन प्रहार शेतकरी मेळाव्यात माजी मंत्री आ.बच्चुभाऊ कडु यांना राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत सुरेशराव लांबे पाटील यांनी माजी मंत्री आमदार कडु यांना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना केंद्र सरकारच्या 8 डिसेंबर 2023 रोजी घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या चुकीच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांनी 5 हजार रुपये भावाने विकलेला कांदा हजार रुपये दराने विकला जात असल्याने त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. बाहेरील देशातून कांद्याला मागणी असतानाही केंद्र सरकारच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कांद्याला किमान 3 हजार रुपये हमीभाव मिळावा.
तसेच शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला घरघर लागली असून दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. तरी दुधाला किमान 50 रुपये हमीभाव मिळावा. त्याचबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुधाचे अनुदानासाठी घातलेले निकष रद्द करुन दुध उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, अशा शेतकऱ्यांच्या मागण्या मांडताना सद्य परिस्थितीत शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे कष्टकरी शेतकऱ्यांना मूलभूत गरजा भागविणेही शक्य होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक व दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार बच्चु कडू यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री. लांबे पाटील यांनी केली आहे.
सदर निवेदनावर सुरेशराव लांबे पाटील, राजुभाऊ शेटे पाटील, मधुकर घाडगे, कुमारजी डावखर, अशोकराव तनपुरे, इन्नुस देशमुख, सलिमभाई शेख, रविद्र भुजाडी, सतिश तरवडे, राजु घनवट आदींसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.