कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे 19 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी बँकॉकला रवाना

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पुणे कृषि महाविद्यालयाचे आठ विद्यार्थी, कोल्हापूर कृषि महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी, धुळे कृषि महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी व राहुरी येथील डॉ. आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सात विद्यार्थी बँकॉक येथील एशियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे काटेकोर शेतीसाठी गुगल अर्थ इंजिन, आयओटी आणि ड्रोन तंत्रज्ञान या विषयावर दि. 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या एक महिना कालावधीच्या प्रशिक्षणासाठी बँकॉक येथे परदेशी दौर्यावर रवाना झाले.

परदेश दौर्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आयोजीत कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली या दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि संशोधन परिषदेतर्फे हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महत्वाचे संशोधन करीत आहे. या संशोधनाबरोबरच काटेकोर शेतीसाठी परदेशातील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाची गरज आहे.

या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांबरोबरच विद्यापीठालाही होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. याप्रसंगी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर व गणेशखिंड येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. रविंद्र बनसोड उपस्थित होते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यान्वित असलेले प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षण घेत असलेले पदव्युत्तर व आचार्य पदवी विद्यार्थ्यांच्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने इ. विविध विषयांवर वेळोवेळी आयोजन करण्यात येत असते.

तसेच या प्रकल्पांतर्गत ड्रोन, रोबोट, आय ओ टी, कृत्रिम बुध्दीमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सींग, अर्थ इंजिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापन विषयावरील संशोधनाकरीता केला जात आहे. सदरील परदेश दौर्याच्या आयोजनासाठी कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे व डॉ. सुनील कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button